Homeताज्या बातम्या

घनकचरा व्यवस्थापनात खाजगी कंपनीचा मनमानी कारभार?वजनात फसवणूक, नागरिकांशी अरेरावीचे आरोप

नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार्‍या खाजगी कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कचरा

लग्नाच्या आमिषाने युवतीची 13 लाखांची फसवणूक
बोगस लग्न लावून देणाऱ्या टोळीकडून नवरदेवाला 4 लाखाला गंडा
भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीकडे



नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणार्‍या खाजगी कंपनीच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. कचरा संकलनातील कथित अनियमितता, महापालिकेची आर्थिक फसवणूक आणि नागरिकांशी अरेरावीची वागणूक यामुळे या व्यवस्थेची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, कचर्‍याचे वजन कृत्रिमरीत्या वाढविण्यासाठी काही ठिकाणी कचर्‍यामध्ये दगड, विटा व इतर जड वस्तू मिसळल्या जात असल्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. त्यामुळे महापालिकेची आर्थिक फसवणूक होत असल्याची चर्चा असून, या संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये कंत्राटी कर्मचारी नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेकदा वारंवार विनंती करूनही कचरा उचलला जात नसल्याने कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद निर्माण होत असल्याचे चित्र आहे. महापालिकेने शहर स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय असल्याने खाजगी कंपनीच्या कामकाजाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करून वजन प्रक्रियेची पडताळणी करावी, संबंधित कर्मचार्‍यांच्या कामकाजाची चौकशी करावी आणि दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी संबंधित कंपनीच्या काही कर्मचार्‍यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यावेळी सर्व कंत्राटी कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवत महापालिका प्रशासनाविरोधात कामबंदचा इशारा दिला होता आणि स्वच्छता व्यवस्था विस्कळीत झाली होती. मात्र आज काही कर्मचारी वेळेवर काम करत नसल्याच्या, नागरिकांशी अरेरावी करत असल्याच्या आणि कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढत असताना सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ नागरिकांची नसून कंत्राटदार कंपनी आणि महापालिका प्रशासनाचीही आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांवर तत्काळ कारवाई करून नागरिकांना दर्जेदार व नियमित स्वच्छता सेवा मिळेल, याची खात्री प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटातील अटींची प्रभावी अंमलबजावणी, जीपीएसद्वारे वाहनांचे निरीक्षण, कचर्‍याच्या वजन प्रक्रियेत पारदर्शकता आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण यासाठी महापालिका प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असल्याचे मत शहरातून व्यक्त होत आहे.

COMMENTS