माहूर: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी माहूर शहरात विविध विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघ

माहूर: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी माहूर शहरात विविध विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
आंदोलकांनी आरोप केला की, रॅली सुरू होण्यापूर्वीच आंदोलनावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काही काळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांच्या मते, शांततापूर्ण आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असून, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या मागे हातात दंडा घेऊन उभ्या असलेल्या एका व्यक्तीची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. तो व्यक्ती नेमका कोण होता, तो अधिकृत पोलिस कर्मचारी होता की अन्य कोणी, तसेच बंदोबस्तामध्ये त्याची भूमिका काय होती, याबाबत आंदोलकांनी प्रशासनाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली.
सभेत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, कॉ. शंकर सिडाम, कॉ. मनोज कीर्तने, कॉ. किशोर पवार, मृत्युंजय पडलवार, साईद खान, जितू चोले आदींनी केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. या वेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नक्षत्रा सिद्धार्थ तमगाडगे हिने इंग्रजी व हिंदी भाषेतून विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात प्रभावी भाषण करून उपस्थितांची दाद मिळवली.
सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, प्रफुल जाधव आणि अविनाश टनमणे यांनी आरोप केला की, दिल्लीतील जंतर-मंतरप्रमाणेच माहूरमधील शांततापूर्ण आंदोलनावरही दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

COMMENTS