कुंडलवाडी: गेल्या चार वर्षांपासून कुंडलवाडी शहरासह परिसरात वारंवार होणार्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांच्या पिकां

कुंडलवाडी: गेल्या चार वर्षांपासून कुंडलवाडी शहरासह परिसरात वारंवार होणार्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांच्या पिकांचे उत्पादन घटल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळे कुटुंबाचा खर्च, मुलांचे शिक्षण, विवाह तसेच बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे कठीण झाले असून अनेक शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले आहेत.
राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांत कर्जमाफीबाबत अनेक वेळा घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे कर्जमाफी होईल, या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी जुने पीककर्ज भरले नाही. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने त्यांची कर्जे थकित खात्यात गेली. परिणामी बँकांकडून नव्याने पीककर्ज मिळण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.
खरीप हंगाम सुरू असताना बियाणे, खते, औषधे आणि मशागतीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असते. मात्र थकीत कर्जामुळे अनेक बँका आधी जुने कर्ज भरण्याची अट घालत असल्याने शेतकर्यांना नवीन कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतीची कामे सुरू ठेवण्यासाठी अनेकांना खाजगी सावकारांकडून जादा व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे.
एकीकडे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे नुकसान होत असताना दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाने शेतकर्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. बियाणे, खते आणि कीडनाशकांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेती करणे अधिक खर्चिक झाले आहे. त्यातच थकीत कर्जावरील वाढते व्याज शेतकर्यांच्या अडचणी वाढवत आहे.
परिसरातील शेतकर्यांनी शासनाने कर्जमाफीबाबत तातडीने स्पष्ट निर्णय घ्यावा, थकीत कर्जदारांना दिलासा द्यावा आणि खरीप हंगामासाठी सुलभपणे पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आर्थिक विवंचनेत सापडलेले शेतकरी पुन्हा सावकारीच्या विळख्यात पूर्णपणे अडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

COMMENTS