Homeताज्या बातम्या

नांदेड शहरातील स्वच्छतेचा कचरा उचलायचा की पैसे घ्यायचे? विवेकनगरमध्ये घनकचरा कर्मचाऱ्यांच्या मुजोरीविरोधात नागरिकांचा संताप

नांदेड: शहरातील स्वच्छतेच्या गाजावाजामागील वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, विवेकनगर परिसरात घनकचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कथित मुजोरीमु

माथेरानला ५ एकर पार्किंग आणि नागपूरच्या क्रीडा संकुलाला ४ कोटींचा निधी; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
महेश दीक्षित आयबीचे (IB) नवे संचालक; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कोपरगाव-निफाड परिसरातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ७.२९ कोटींचा निधी मंजूर
NANDED WAGHALA CITY MUNICIPAL CORPORATION, NANDED

नांदेड: शहरातील स्वच्छतेच्या गाजावाजामागील वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, विवेकनगर परिसरात घनकचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कथित मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. घरासमोरील कचरा नियमित उचलण्याऐवजी पैसे मागितले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, पैसे न दिल्यास कचरा उचलण्यास टाळाटाळ केली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.

महानगरपालिकेने शहरातील घनकचरा संकलन व वाहतुकीचे कंत्राट खासगी संस्थेला दिले आहे. मात्र, या कंत्राटी यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र विवेकनगर भागात दिसून येत आहे. अनेकदा नागरिकांनी विनंती करूनही घरासमोरील कचरा उचलला जात नसल्याचे सांगितले जात असून, काही कर्मचाऱ्यांकडून कचरा उचलण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे नागरिकांनी याबाबत जाब विचारला असता संबंधित कर्मचारी उद्धट भाषेत बोलत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेषतः महिलांशीही उर्मटपणे वाद घालणे, अरेरावीची भाषा वापरणे आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शहरातील अनेक भागांत अस्वच्छतेचे प्रमाण वाढत असून रस्त्यांच्या कडेला आणि रिकाम्या जागांवर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. स्वच्छ शहराचे दावे करणाऱ्या महानगरपालिकेच्या प्रशासनाने प्रत्यक्षात कंत्राटी यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याची टीकाही होत आहे.

विवेकनगरमधील नागरिकांनी महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदाराला जाब विचारावा, कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या आरोपांची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे. स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असताना नागरिकांना मूलभूत सेवा मिळण्यासाठी विनवण्या कराव्या लागणे आणि पैशांची मागणी सहन करावी लागणे, ही नांदेड महानगरपालिकेसाठी गंभीर बाब मानली जात आहे. आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन ठोस कारवाई करते की नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS