पालघर: मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पालघर, वसई-विरारमध्येही पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे हाहाकार

पालघर: मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. पालघर, वसई-विरारमध्येही पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच जनजीवनावरही याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
वसईत रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात कार घुसली
वसई पश्चिमेतील सनसिटी गास रोडवरील तुळजा मंदिराच्या पुढे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहन रस्त्यालगत साचलेल्या पाण्यात घुसले. चालकाने दिलेल्या माहितीनुसार, वाहनासमोर अचानक कुत्रा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या २ ते ३ फूट साचलेल्या पाण्यात पडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन कारमधील चौघांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसली, तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सूर्या आणि वैतरणा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच असून सूर्या आणि वैतरणा नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. डहाणू तालुक्यातील उर्से साये येथील ‘कॉलनी पाडा’ पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, नागरिक घरदार सोडून सुरक्षित स्थळी आश्रयाला गेले आहेत. तर दाभाडी बेटामध्ये १० ते १५ नागरिक अडकून पडले असून तेथे मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
घाटमाथ्याला रेड अलर्ट; पुढील ४८ तास महत्त्वाचे
सध्या पालघर परिसरात चक्रीय परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून अत्यंत सक्रिय आहे. यामुळे या भागात पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम शेजारील गुजरात राज्यावरही होत असून, तेथे पुढील ४८ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

COMMENTS