पुणे: कात्रज येथे सोमवारी रात्री जुन्या वादातून एका १७ वर्षांच्या तरुणाची कोयत्याने सपासप वार करून सात जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केल्याचा

पुणे: कात्रज येथे सोमवारी रात्री जुन्या वादातून एका १७ वर्षांच्या तरुणाची कोयत्याने सपासप वार करून सात जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गणेश रवींद्र माळवे (वय १७) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहर व कात्रज परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिला नसल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, त्यांची भरपावसात पोलीस व्हॅनच्या बोनेटला बांधून शहरात धिंड काढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत गणेश माळवे हा आपल्या मित्रांसोबत मोबाईल दुरुस्तीसाठी गेला होता. तेथे आरोपींच्या सात जणांच्या टोळक्याने त्याला गाठून जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर कोयत्याने अचानक हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तेथेच सोडून आरोपी फरार झाले. या हल्ल्यात गणेशचा जागीच मृत्यू झाला. या अल्पवयीन मुलाच्या निर्घृण हत्येमुळे त्याच्या संतप्त नातेवाईक व पालकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर मोठा आक्रोश करत गोंधळ घातला आणि आरोपींना समोर आणण्याची मागणी केली.
सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल; उर्वरित तिघांचा शोध सुरू
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकूण सात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतले असून फरार असलेल्या उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. उर्वरित सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी पीडित कुटुंबाला दिले आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

COMMENTS