बीड: महामानव अभिवादन ग्रुप, बीडच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या शालेय साहित्य वाटप उपक्रमाअंतर्गत साहित्यरत्न

बीड: महामानव अभिवादन ग्रुप, बीडच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येत असलेल्या शालेय साहित्य वाटप उपक्रमाअंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रभातकार विद्यालय, पूरग्रस्त कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, खंडेश्वरी परिसर येथे ११६ गरजू विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
महामानव अभिवादन ग्रुपतर्फे दरवर्षी ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दानशूर व्यक्तींकडून वही, पेन व आर्थिक स्वरूपात मदत संकलित केली जाते. या मदतीतून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. यावर्षी आतापर्यंत दहा टप्प्यांत तब्बल १,०२१ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले असून, महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन व राष्ट्रीय दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभातकार विद्यालयाचे मुख्याध्यापक अंगदसिंग परदेशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी आणि दैनिक मराठवाडा साथीचे जिल्हा प्रतिनिधी संदीप बेदरे उपस्थित होते. तसेच ’वाचाल तर वाचाल’चे अध्यक्ष डी. जी. वानखेडे, समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले आणि बी. जी. दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डी. एम. राऊत यांनी प्रास्ताविकातून महामानव अभिवादन ग्रुपच्या शैक्षणिक, सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती देत आगामी योजनांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. एम. भोले यांनी केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमुख पाहुणे संदीप बेदरे यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. महामानव अभिवादन ग्रुपकडून मिळणारी वही आणि पेन हे केवळ साहित्य नसून, ती तुमच्या यशाची पहिली पायरी आणि प्रेरणा आहे, असे ते म्हणाले.
वैभव स्वामी यांनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक करत गरजू विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या मोफत शिकवणी उपक्रमाचे अभिनंदन केले. तसेच आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त १३ नोव्हेंबर रोजी आणखी १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची आणि ग्रुपच्या सर्व उपक्रमांना सहकार्य करण्याची घोषणा केली.
अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक अंगदसिंग परदेशी यांनी अत्यंत गरीब वस्तीतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले. योग्य सहकार्य मिळाल्यास याच विद्यार्थ्यांमधून डॉक्टर, अभियंते, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ घडू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच सेवानिवृत्तीनंतर महामानव अभिवादन ग्रुपच्या माध्यमातून समाजसेवेत सक्रिय सहभागी होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु. माही लोखंडे हिने राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर प्रभावी भाषण केले. तिच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल ’वाचाल तर वाचाल’ या उपक्रमातर्फे सावित्रीबाई फुले यांचे चरित्रग्रंथ देऊन तिचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांची शिस्त, शांतता आणि मार्गदर्शन ऐकण्यातील एकाग्रता पाहून महामानव अभिवादन ग्रुपचे अध्यक्ष जी. एम. भोले यांनी समाधान व्यक्त केले. याच शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षी आणखी एकदा शालेय साहित्य वाटप करण्याची घोषणाही त्यांनी केली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ए. बी. जौजाळ यांनी केले. यावेळी आर. डी. चक्रे, पी. व्ही. झिरपे, एस. एम. पंडित, डी. ए. नागरगोजे, टी. बी. गरड, बी. ए. ढमाळ, ए. बी. चितळे यांच्यासह शिक्षकवृंद, मान्यवर, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS