Homeताज्या बातम्या

रस्ते की पार्किंग? नांदेडची वाहतूक कोंडीत गुदमरली; कोचिंग क्लासेस, बेशिस्त पार्किंग आणि निष्क्रिय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!

नांदेड: नांदेड शहरातील वाहतूक कोंडी ही आता केवळ दैनंदिन गैरसोय राहिलेली नसून, ती शहराच्या नियोजनातील त्रुटी आणि वाहतूक शिस्तीच्या अभावाचे गंभीर च

किनवट जवळील ’भूलजा’ गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; अडीच वर्षांच्या चिमुकलीसह दोघे गंभीर जखमी
एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ; प्रशासन जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र सज्जछत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादशिबिरे संपली तरी नागरिकांना सेवांचा लाभ कायम मिळणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
महिला कला महाविद्यालयात मा. अशोकरावजी पाटील (दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नांदेड: नांदेड शहरातील वाहतूक कोंडी ही आता केवळ दैनंदिन गैरसोय राहिलेली नसून, ती शहराच्या नियोजनातील त्रुटी आणि वाहतूक शिस्तीच्या अभावाचे गंभीर चित्र बनली आहे. सकाळी शासकीय कार्यालये सुरू होण्याच्या वेळेत, शाळा-महाविद्यालयांच्या गर्दीत आणि संध्याकाळी कार्यालये सुटल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत. विशेषतः आनंदनगर परिसरातील नामांकित कोचिंग क्लासेससमोरील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

या भागातील अनेक मोठ्या कोचिंग संस्थांनी आधुनिक आणि भव्य इमारती उभारल्या असल्या, तरी विद्यार्थ्यांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था केलेली नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी, हजारो दुचाकी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या राहत असून, वाहनांसाठी उपलब्ध असलेला रस्ता अर्ध्यावर येतो. त्यातच विद्यार्थ्यांना घेण्यासाठी येणार्‍या स्कूल बस, खासगी व्हॅन आणि चारचाकी वाहनांची रांग लागल्याने काही काळ संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडतो.

वाहतूक कोंडीसाठी केवळ पायाभूत सुविधांची कमतरता जबाबदार नसून, नागरिकांची वाहतूक नियमांप्रती असलेली बेफिकिरीही तितकीच कारणीभूत ठरत आहे. नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, रस्त्याच्या मधोमध वाहन थांबविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे आणि सिग्नल व नियमांकडे दुर्लक्ष करणे यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. यात भर म्हणजे काही फेरीवाले आणि हातगाडीधारक रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटत असल्याने वाहतुकीचा मार्ग अधिकच अरुंद होतो. परिणामी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांनाही मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो.

नागरिकांच्या मते, वाहतूक शाखेकडून अधूनमधून मोहीम राबविली जाते; मात्र ती सातत्यपूर्ण नसल्याने परिस्थितीत फारसा बदल दिसून येत नाही. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई, कोचिंग क्लासेसना पार्किंगची सक्ती, अतिक्रमण हटविण्याची प्रभावी मोहीम आणि गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती ही काळाची गरज बनली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार वाहतूक व्यवस्थेचे दीर्घकालीन नियोजन झाले नाही, तर नांदेडची वाहतूक समस्या भविष्यात आणखी गंभीर स्वरूप धारण करेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

COMMENTS