मुंबई : मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (MHAD

मुंबई : मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (MHADA) लवकरच 2,640 घरांच्या बहुप्रतीक्षित लॉटरीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांसाठी पुढील आठवड्यात सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी 2026 संदर्भातील संपूर्ण वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे सुमारे 75 हजारांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा अखेर संपण्याची शक्यता आहे.मुंबई मंडळाने 30 मार्च 2026 रोजी मुंबईतील विविध भागांतील 2,640 सदनिकांसाठी संगणकीय सोडतीची घोषणा केली होती. या योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून एकूण 75,366 अर्ज प्राप्त झाले आहेत.सुरुवातीला ही लॉटरी 15 मे रोजी काढण्याचे नियोजन होते. मात्र अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीची तारीख 5 जून करण्यात आली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजी वाढली होती.या लॉटरीमध्ये मुंबईतील कन्नमवार नगर (विक्रोळी), पत्राचाळ (गोरेगाव), जुने मागाठाणे (बोरीवली), गोराई, सुभाष नगर (चेंबूर), गांधीनगर (वांद्रे), पंतनगर (घाटकोपर), गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर (दादर), पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल (वडाळा) या भागांतील घरे उपलब्ध आहेत. या सोडतीत विविध उत्पन्न गटांसाठी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – 145 घरे
- अल्प उत्पन्न गट (LIG) – 858 घरे
- मध्यम उत्पन्न गट (MIG) – 798 घरे
- उच्च उत्पन्न गट (HIG) – 839 घरे
नागरिकांना दिलासा देण्यासाठी म्हाडाने कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील 1,221 सदनिकांच्या किमतीत 7.5 टक्के कपात केली आहे. यापैकी 610 सदनिका उच्च उत्पन्न गटासाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आल्या असून या निर्णयालाही अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.म्हाडा प्रशासनाच्या माहितीनुसार, सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ यासह संपूर्ण अधिकृत कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. संबंधित माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.मुंबईत परवडणाऱ्या दरात घर मिळवण्याची संधी शोधणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आता फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा शिल्लक आहे.

COMMENTS