Homeताज्या बातम्या

नायगाव तालुक्यात पन्नास हजार हेक्टरवर खरीप पेरण्या; पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे बहरलेली पिके संकटातनायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर व बरबडा मंडळांतील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील

कुंडलवाडी शहरात भेसळयुक्त विक्रीचा प्रकार; नागरिकांमध्ये संताप
राज्यात इंधनसाठा मुबलक; शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मंत्री भरणे यांचे आवाहन
संगमनेरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार : आ. खताळ



नायगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या पूर्ण केल्या. तालुक्यातील नायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर आणि बरबडा या पाच महसूल मंडळांमध्ये मिळून अंदाजे पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांची उगवण चांगली झाली आणि काही दिवसांपूर्वीपर्यंत संपूर्ण शिवार हिरवाईने नटले होते. मात्र,  पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून पिकांवर पाण्याचा ताण स्पष्टपणे दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत, तर मूग, उडीद आणि कापूस पिकांची वाढ खुंटत आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पिके करपण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे.
यावर्षी शेतीसाठी शेतकर्‍यांनी बियाणे, खते, कीडनाशके, मशागत आणि मजुरीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. अनेकांनी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेती उभी केली आहे. आता पिके डोळ्यांसमोर सुकू लागल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील आनंदाची जागा चिंतेने घेतली आहे. दिवसभर शेतात जाऊन पिकांची पाहणी करणे आणि आकाशाकडे आशेने नजर लावून बसणे, एवढेच त्यांच्या हातात उरले आहे.सिंचनाची सुविधा नसलेल्या हजारो शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. जनावरांचा चारा, घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि शेतीचा वाढता खर्च या सर्व जबाबदार्‍या एकाच वेळी डोळ्यासमोर उभ्या ठाकल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्याही खचला आहे. वेळेत दमदार पाऊस झाला नाही तर बहारदार आलेले पीक गमावण्याची भीती त्यांना सतावत आहे. ज्येष्ठ शेतकर्‍याच्या मते, येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पिकांना नवसंजीवनी मिळू शकते. मात्र, पावसाचा खंड आणखी वाढल्यास उत्पादनात मोठी घट होऊन शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील नायगाव, नरसी, मांजरम, कुंटूर आणि बरबडा या पाचही मंडळांतील शेतकरी आता वरुणराजाकडे आशेने डोळे लावून बसला आहे. आता मोठा पाऊस झाला तरच खरीप हंगामाचे पिके वाचतील , अशी भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त होत असून संपूर्ण तालुक्यात शेतकरी आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

COMMENTS