नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेटला अभिमानास्पद ठरणारा मोठा सन्मान जाहीर करत माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि भारतीय
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारतीय क्रिकेटला अभिमानास्पद ठरणारा मोठा सन्मान जाहीर करत माजी पुरुष कर्णधार सौरव गांगुली आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा यांचा प्रतिष्ठित आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन यांनाही याच वेळी या मानाच्या यादीत स्थान देण्यात आले. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे झालेल्या विशेष समारंभात या सन्मानाची घोषणा करण्यात आली.
क्रिकेटमधील असामान्य कामगिरी, नेतृत्व आणि खेळाच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान यांची दखल घेत हा सन्मान प्रदान केला जातो. या निवडीमुळे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांच्या योगदानावर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी तिन्ही मानकरी क्रिकेटपटूंचे अभिनंदन करताना सांगितले की, आपल्या उत्कृष्ट खेळाने, नेतृत्वाने आणि सातत्यपूर्ण योगदानाने क्रिकेटला नवी दिशा देणार्या खेळाडूंना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान दिले जाते. सौरव गांगुली, अंजुम चोप्रा आणि केविन पीटरसन यांनी आपल्या देशांचे प्रभावी नेतृत्व करत क्रिकेटविश्वावर कायमस्वरूपी ठसा उमटवला आहे. त्यांची कारकीर्द आणि कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या सन्मानानंतर सौरव गांगुली यांनी आनंद व्यक्त करत हा आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील अत्यंत संस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले. क्रिकेटमधील दिग्गजांच्या यादीत स्वतःचे नाव समाविष्ट होणे हा मोठा सन्मान असून, भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हे आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळाल्यामुळे आपल्या क्रिकेट प्रवासाला विशेष मान्यता मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच या सन्मानाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे आणि अध्यक्ष जय शाह यांचे आभार मानत, भविष्यातही क्रिकेटच्या प्रगतीसाठी योगदान देत राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS