नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळ
नांदेड : हदगाव तालुक्यातील तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. मंजूर दोन वैद्यकीय अधिकार्यांच्या पदांपैकी केवळ एक महिला वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा भार त्यांच्यावर पडला असून रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत.
तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात 26 गावे आणि पाच उपकेंद्रांचा समावेश आहे. सुमारे 50 हजारांहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी या केंद्रावर असून दररोज 150 ते 200 रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, एकाच वैद्यकीय अधिकार्याला बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा, प्रशासकीय कामकाज तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी अशी अनेक कामे सांभाळावी लागत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. माहितीनुसार, केंद्रातील दुसरे वैद्यकीय अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून गैरहजर आहेत. परिणामी रुग्णांची गैरसोय वाढली असून अनेकांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला अतिरिक्त आर्थिक झळ बसत आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुसमुरे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पर्यायी वैद्यकीय अधिकार्याच्या नियुक्तीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, अद्याप नियुक्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देणार्या आरोग्य विभागाने तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पद तातडीने भरून आरोग्य सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS