नागपूर : राज्य शैक्षणिक मंडळाच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या धड्यावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील स
नागपूर : राज्य शैक्षणिक मंडळाच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील ‘लोकनृत्य’ या धड्यावरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील समृद्ध लोककला आणि लोकनृत्यांना अपेक्षित महत्त्व देण्यात आले नसल्याचा आरोप साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे.
पाठ्यपुस्तकात एकूण पाच लोकनृत्यांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी केवळ एक लोकनृत्य महाराष्ट्राशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित नृत्यप्रकार इतर राज्यांतील असल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे पुरेसे प्रतिनिधित्व होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या संदर्भात मुख्यमंत्री यांना पत्र लिहून पाठ्यपुस्तकात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावरच महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारशाची व्यापक माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. महाराष्ट्रात लावणी, लेझीम, धनगरी गजा, गोंधळ, कोळी नृत्य, पोवाडा यांसारख्या अनेक समृद्ध लोकनृत्य परंपरा आहेत. राज्यातील विविध विभागांनुसार या नृत्यप्रकारांचा अभ्यासक्रमात समावेश करता आला असता, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. आवश्यक असल्यास पूरक सूचना किंवा दुरुस्तीपत्रकाद्वारे हा धडा सुधारण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. या विषयावर राज्य शैक्षणिक संशोधन संस्थेकडून आणि पाठ्यपुस्तक निर्मिती संस्थेकडून स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आलेली नसल्याने त्याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. अभ्यासक्रम तयार करताना स्थानिक संस्कृतीला किती प्राधान्य दिले जाते, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही प्राथमिक वर्गाच्या एका पाठ्यपुस्तकातील ऐतिहासिक उल्लेखावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संबंधित मजकुरात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लोकनृत्याच्या धड्यावरील आक्षेपांनंतर शासन आणि संबंधित शैक्षणिक संस्थांची भूमिका काय असणार, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही राज्याच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग मानली जाते. त्यामुळे नव्या पिढीपर्यंत हा सांस्कृतिक वारसा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अभ्यासक्रमात स्थानिक परंपरांचा अधिक व्यापक समावेश करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS