मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या अपहाराच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापले असतांना
मुंबई : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधीच्या अपहाराच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण तापले असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांना अखेर प्रभू श्रीरामांची आठवण झाल्याचा आनंद आहे. त्यांच्या मते, प्रभू श्रीरामांच्या आदर्शांपासून दूर गेल्यामुळेच संबंधित पक्षाची राजकीय अधोगती झाली. आता त्यांनी पुन्हा राममार्ग स्वीकारला, तर त्याचा फायदा त्यांनाच होईल, असे त्यांनी सूचित केले.
फडणवीस म्हणाले, प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे आदर्श आणि नैतिक मूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या विचारांचा स्वीकार केवळ एखाद्या आंदोलनापुरता मर्यादित न राहता तो दैनंदिन आचरणात उतरला पाहिजे. रामरक्षेचे पठण आणि रामाच्या आदर्शांचे अनुसरण सातत्याने झाले, तर समाज आणि राजकारण दोन्ही अधिक सुदृढ होतील. अयोध्येतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे विविध राजकीय पक्षांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने या विषयावर जनभावना व्यक्त करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून, धार्मिक श्रद्धा आणि सार्वजनिक निधीच्या पारदर्शकतेचा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या आंदोलनामागील राजकीय हेतूंवर अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत, रामाचे नाव केवळ प्रसंगानुरूप घेण्याऐवजी त्यांच्या आदर्शांनुसार सातत्याने वागण्याची गरज अधोरेखित केली.

COMMENTS