https://youtu.be/Z-GLsMojQNM १ जुलैपासून हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट्सना मोठा दिलासा मिळाला असून कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत थेट १८३ र
१ जुलैपासून हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट्सना मोठा दिलासा मिळाला असून कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत थेट १८३ रुपये ५० पैशांची मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर आता दिल्लीत ३,११३ रुपयांवरून २,९३० रुपयांवर आले आहेत. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांत झालेल्या दरवाढीनंतर ही पहिलीच मोठी कपात आहे. या निर्णयामुळे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ढाबे आणि केटरिंग व्यवसाय करणाऱ्यांचा दैनंदिन खर्च आता लक्षणीय कमी होणार आहे. यासोबतच खाजगी इंधन किरकोळ विक्रेता कंपनी ‘नायरा एनर्जी’ने देखील आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींचा फायदा ग्राहकांना देत पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त केले आहे. मात्र, एकीकडे व्यावसायिक ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असताना, सर्वसामान्य घरगुती ग्राहकांची प्रतीक्षा मात्र कायम आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत या महिन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दर महिन्याच्या १ तारखेला गॅस दरांचे पुनरावलोकन केले जाते, पण घरगुती गॅसवर आंतरराष्ट्रीय दरांसोबतच सरकारी धोरणांचा मोठा प्रभाव असतो. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे बजेट यंदा ‘जैसे थे’ राहणार आहे.

COMMENTS