मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त असलेल्या उपसभापतीपदासाठी 1 जुलै रोजी दुपारी एक वाजता निवडणूक होणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आ

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील रिक्त असलेल्या उपसभापतीपदासाठी 1 जुलै रोजी दुपारी एक वाजता निवडणूक होणार असून, याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सभागृहातील संख्याबळ लक्षात घेता हे पद सत्ताधारी महायुतीकडे जाण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. मात्र, महायुतीतील अंतर्गत राजकीय समीकरणांमुळे कोणाची निवड होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
उपसभापतीपदासाठी इच्छुक सदस्यांना 30 जून रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी एक वाजता अर्जांची छाननी केली जाणार आहे. एकापेक्षा अधिक उमेदवार मैदानात राहिल्यास 1 जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. विधान परिषदेच्या कार्यपद्धतीतील नियमांनुसार, उमेदवारीसाठी लेखी प्रस्ताव विधानमंडळ सचिवालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. यासाठीचे अधिकृत नमुने सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विधान परिषदेत सत्ताधारी आघाडीचे बहुमत असल्याने उपसभापतीपद महायुतीकडे जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे. जरी भारतीय जनता पक्षाचे सदस्य संख्येने अधिक असले, तरी आघाडीतील अंतर्गत समन्वयानुसार हे पद शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात या संदर्भात चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असून, अंतिम निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.
नीलम गोर्हे पुन्हा आघाडीवर?
उपसभापतीपदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे डॉ. नीलम गोर्हे. यापूर्वी त्यांनी उपसभापती म्हणून काम पाहिले असून, सभागृहाच्या कामकाजाचा त्यांना मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला विशेष महत्त्व दिले जात आहे. त्याचबरोबर कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांची नावेही संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत आहेत. पक्षांतर्गत संतुलन, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि आगामी राजकीय रणनीती लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मानले जाते.
नव्या नेतृत्वाला संधी की अनुभवी हातांवर विश्वास?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा अनपेक्षित निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवला जाईल की नव्या पिढीतील एखाद्या सदस्याला महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 30 जूननंतर कोणकोणते उमेदवार अर्ज दाखल करतात, यावर निवडणूक बिनविरोध होणार की मतदानाद्वारे, हे स्पष्ट होईल.

COMMENTS