Homeताज्या बातम्या

एकत्र विमान प्रवासावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या; “मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण?” मुख्यमंत्री फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई : राज्याच्या राजकारणात एका विमान प्रवासानंतर निर्माण झालेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमु

मातोश्री शासकीय ई.बी.सी. मुलांच्या वसतिगृह प्रवेशासाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावेत; बीडमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड विभागातील विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ५४३ प्रकरणे निष्पन्न; ३.८१ लाखांचा महसूल वसूल
आम्ही शेजारी बसलो असतो तर…”, मुख्यमंत्री फडणवीसांचं ठाकरेंबरोबरच्या विमान  प्रवासाबाबत भाष्य - Marathi News | Devendra Fadnavis Reaction Uddhav  Thackeray Flight Travel Movie ...

मुंबई : राज्याच्या राजकारणात एका विमान प्रवासानंतर निर्माण झालेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीतील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांनी मिश्किल शैलीत उत्तर देत राजकीय आरोप फेटाळून लावले आहेत.

परभणी येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी, अलीकडील विमान प्रवासादरम्यान देवेंद्र फडणवीस हतबल आणि आत्मविश्वासहीन वाटत असल्याचा दावा केला होता. तसेच त्यांच्या स्वतःच्या पक्षातील काही मंडळीच त्यांचे राजकीय बळ कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना, “माझे पंख नसतील तर ते छाटणार कोण? मला महाराष्ट्रातील जनतेचा आणि पक्ष नेतृत्वाचा पूर्ण विश्वास व आशीर्वाद लाभला आहे,” असे सांगितले.

विमान प्रवासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्या प्रवासात दोघे वेगवेगळ्या जागांवर बसले होते. शेजारी बसण्याची वेळ आली असती, तर नेहमीप्रमाणे संवाद झाला असता. मात्र, प्रवासादरम्यान स्वतःला उपलब्ध वेळेत चित्रमालिका (सिरीज) पाहण्याची आपली सवय असल्याने कोणतीही विशेष चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय चर्चांच्या स्वरूपावर नाराजी व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक विमान प्रवासात नेते एकत्र दिसले की त्यावर अनावश्यक तर्कवितर्क लावले जातात. राज्यासमोर विकास, पायाभूत सुविधा आणि जनहिताचे प्रश्न अधिक महत्त्वाचे असून, अशा चर्चांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा विधायक कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना त्यांच्या नेतृत्वाभोवती अंतर्गत दबाव वाढत असल्याचा दावा केला होता. तसेच, राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाच्या स्पर्धेचा उल्लेख करत काही वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय प्रवासाचे उदाहरणही त्यांनी दिले होते. या परस्पर आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, आगामी काळात या मुद्द्यावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, दोन्ही बाजूंनी केलेल्या विधानांमुळे राजकीय चर्चांना नवे परिमाण मिळाले असले तरी जनतेच्या दृष्टीने विकास आणि लोककल्याणाचे प्रश्नच अधिक महत्त्वाचे असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

चौकट: उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले होते?

परभणी येथे उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कालपरवा ते माझ्यासोबत विमानात बसले होते. पण हतबल होते. कळतच नव्हते हे मुख्यमंत्री आहेत. असा काय झाला हा? आत्मविश्वास गमावलेला माणूस. आपले पंख कापतात. कापणारे आपलीच माणसे आहेत, हे त्यांना कळत आहे. न्याय कोणाकडे मागणार, कोणते दार ठोठावणार? ते दार उघडले तरी पंख कापणार,” अशी टीका ठाकरे यांनी केली होती.

COMMENTS