Homeताज्या बातम्या

राष्ट्रकुल स्पर्धेत मीराबाई चानूच्या खांद्यावर भारताच्या वेटलिफ्टिंगची धुरा; ग्लासगो २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली: ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी (Commonwealth Games 2026) भारतीय वेटलिफ्टिंग संघाची अधिकृत घोषणा करण्य

तांत्रिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल; पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला वेग
नेकनुर येथील एसबीआय एटीएम चार महिन्यांपासून बंद; नागरिकांचा बँक प्रशासनाविरोधात संताप
कोल्हापूरच्या राजकारणात टक्केवारीचा बॉम्ब! आमदार राजेश क्षीरसागरांचा कथित कमिशन व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली: ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी (Commonwealth Games 2026) भारतीय वेटलिफ्टिंग संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या बलाढ्य संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिच्याकडे सोपवण्यात आली आहे. मीराबाई महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मीराबाई चानूकडून सुवर्णपदकाची हॅटट्रिकची अपेक्षा

राष्ट्रकुल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूने आतापर्यंत तीन पदकांची कमाई केली आहे. तिने ग्लासगो २०१४ मध्ये रौप्यपदक, तर गोल्ड कोस्ट २०१८ आणि बर्मिंगहॅम २०२२ च्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावून देशाची मान उंचावली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तिच्या दांडग्या अनुभवामुळे यंदाच्या स्पर्धेतही भारताला तिच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोदीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ४८ किलो वजनी गटात तिने विजेतेपद मिळवले होते. मात्र, खांद्याच्या दुखापतीमुळे तिला आशियाई स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. आता ती पूर्ण तयारीने राष्ट्रकुलच्या रिंगणात उतरणार आहे.

महिला व पुरुष संघात कसलेले खेळाडू

महिलांच्या गटात बर्मिंगहॅम २०२२ मधील पदक विजेत्या बिंद्याराणी देवी (५८ किलो) आणि हरजिंदर कौर (६९ किलो) यांचाही संघात समावेश आहे. मागील राष्ट्रकुल स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी रौप्यपदकाची कमाई केली होती.

पुरुष विभागात लवप्रीत सिंग याच्या कामगिरीकडे सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. बर्मिंगहॅम स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा लवप्रीत यावेळी ११० किलोपेक्षा अधिक वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. याशिवाय ऋषिकेश सिंग, अजय बाबू आणि दिलबाग सिंग हे तरुण खेळाडू पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत नशीब आजमावणार आहेत.

ग्लास्गोमधील ‘एसईसी आर्माडिलो’ क्रीडांगणावर २६ ते ३० जुलै दरम्यान वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा रंगणार आहेत. मागील बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ५ सुवर्णांसह एकूण ९ पदके जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते.

चौकट: भारतीय वेटलिफ्टिंग संघ (Indian Weightlifting Squad)

  • महिला विभाग: मीराबाई चानू (४८ किलो), ज्ञानेश्वरी यादव (५३ किलो), बिंद्याराणी देवी (५८ किलो), हरजिंदर कौर (६९ किलो), संजना (७७ किलो), मार्टिना देवी (८६ किलोपेक्षा अधिक).
  • पुरुष विभाग: ऋषिकेश सिंग (६० किलो), एम. राजा (६५ किलो), अजय बाबू (७९ किलो), दिलबाग सिंग (९४ किलो) आणि लवप्रीत सिंग (११० किलोपेक्षा अधिक).

COMMENTS