मानवी देह हा भक्तिमार्गातून जीवनाची सार्थकता करण्यासाठी मिळालेला असून संतांच्या विचारांमध्ये मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.

मानवी देह हा भक्तिमार्गातून जीवनाची सार्थकता करण्यासाठी मिळालेला असून संतांच्या विचारांमध्ये मानवी जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने संतांचे अभंगरूपी विचार वाचून त्यांचे मनन-चिंतन करावे, असे प्रतिपादन कीर्तनकार सोपान महाराज शास्त्री यांनी केले.
शहरातील स्व. झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आषाढी वारीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित कीर्तन महोत्सवात गुरुवारी (दि. 18) हिंगोली येथील सोपान महाराज शास्त्री यांचे सांप्रदायिक कीर्तन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला. कीर्तन सेवेसाठी संत संत तुकाराम महाराज यांच्या ‘ज्याचे गर्जता पवाडे । कळिकाळ पाया पडे ॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सहा चौं अठरा जणा ॥’ या अभंगावर सोपान महाराजांनी प्रभावी निरूपण केले. विठ्ठलाच्या महिम्याचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पंढरपूरच्या विठ्ठलाचे पराक्रम आणि कीर्ती इतकी महान आहे की, साक्षात काळदेखील त्याच्या चरणी नतमस्तक होतो. संतांनी आपल्या विचारांची पडताळणी वेद, शास्त्र, विद्या आणि पुराणांच्या आधारावर करूनच समाजासमोर मांडली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भजनाचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, भजनामुळे देह शुद्ध होतो, मन निर्मळ बनते आणि अंतःकरणात पांडुरंगाविषयी अनामिक ओढ निर्माण होते. भगवंताच्या नामस्मरणातून जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. आषाढी वारीतील वारकरी मैलोनमैल पायी प्रवास करताना भजन आणि विठ्ठलनामाच्या बळावरच पुढे जातात. त्यामुळे प्रत्येकाने दररोज नामस्मरण आणि भजनासाठी वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेवर भाष्य करताना सोपान महाराज म्हणाले की, कितीही संपत्ती असली तरी एका क्षणानेही आयुष्य वाढवता येत नाही. ‘क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती’ या अभंगाचा दाखला देत त्यांनी जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. मानवजन्म दुर्लभ असून या अल्प आयुष्यात केलेली सत्कर्मेच जीवनाचे खरे सार्थक ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने वेळेचे महत्त्व ओळखून जीवनातील कर्तव्य पार पाडावे, असे त्यांनी सांगितले. या कीर्तन सोहळ्यास टाळकरी, वारकरी, गायक मंडळी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS