मुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्र्यांकडे निवेदन, मराठवाड्यातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नको नांदेड : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकार

मुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्र्यांकडे निवेदन, मराठवाड्यातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड नको
नांदेड : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर सुरू झालेल्या भेसळविरोधी धडक कारवाईला मराठवाड्यातूनही मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांना विरोध वाढू लागला आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्राहक संरक्षण व अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तुकाराम मुंडे यांची बदली करू नये, अशी मागणी केली आहे.
मराठवाड्यात दूध, पनीर, मिठाई, खाद्यतेल आणि अन्य खाद्यपदार्थांतील भेसळीचे प्रकार सातत्याने समोर येत असताना, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात आरोग्याच्या दृष्टीने कठोर कारवाईची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या शिष्टमंडळाने अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
ग्राहक पंचायतीचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे ग्राहकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांचा सामना करावा लागत आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ, हॉटेलमधील अस्वच्छता, डेअरीमधील आरोग्यास अपायकारक परिस्थिती तसेच रुग्णालयांमधील औषध विक्रीतील अनियमितता यासंदर्भात वारंवार सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीनंतर प्रथमच प्रभावी कारवाई सुरू झाली आहे.
त्यांनी आरोप केला की, भेसळीच्या साखळीत काही राजकीय व्यक्ती, व्यापारी, उद्योजक, औषध कंपन्या आणि भ्रष्ट अधिकारी सहभागी असून, त्यांच्याकडून मुंडे यांच्या बदलीसाठी दबाव टाकला जात आहे. मात्र, सरकारने अशा दबावाला बळी पडू नये, अशी भूमिका ग्राहक पंचायतीने घेतली आहे. मराठवाड्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन भेसळमुक्त अन्नपुरवठ्यासाठी सुरू असलेली मोहीम अधिक व्यापक व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत ग्राहक पंचायतीने राज्यभर जनजागृती मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. तसेच, हजारो नागरिक तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ शासनाकडे पत्रे पाठविणार असल्याची माहितीही विजय सागर यांनी दिली. मराठवाड्यातील ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर कठोर भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांना राजकीय दबावापासून संरक्षण मिळणे आवश्यक असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

COMMENTS