Oplus_16908288 शेवगाव : शहरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी सायंकाळी ‘हिंदू जनआक्रोश

शेवगाव : शहरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी सायंकाळी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सायंकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गांवरून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत मोर्चा क्रांती चौक येथे पोहोचला. त्यानंतर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेला आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, हिंदुत्ववादी नेते सागर बेग तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (पश्चिम महाराष्ट्र) चे उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
यावेळी वक्त्यांनी महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाने अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे आवाहनही करण्यात आले.
सकल हिंदू समाजाच्या या जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच विविध हिंदुत्ववादी आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. संपूर्ण मोर्चादरम्यान शांतता, संयम आणि शिस्त राखण्यात आली. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, या एकमुखी मागणीने शेवगाव शहरातील वातावरण बुधवारी रात्री ढवळून निघाले.

COMMENTS