प्राचार्या तायडे डी.ओ. व प्रा. गायकवाड आर.एन. यांना भावपूर्ण निरोप बीड । प्रतिनिधी : राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम वि

प्राचार्या तायडे डी.ओ. व प्रा. गायकवाड आर.एन. यांना भावपूर्ण निरोप
बीड । प्रतिनिधी : राष्ट्रीय माध्यमिक, उच्च माध्यमिक व व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालय, बीड येथे प्राचार्या तथा मुख्याध्यापिका श्रीमती तायडे द्रोपदी ओंकार व राष्ट्रीय कन्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विद्यालयाचे प्राध्यापक श्री. गायकवाड राम नारायण यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्टचे सचिव मा. श्री. सुभाषचंद्रजी मिठ्ठूलालजी सारडा साहेब होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या अधिसभा सदस्या मा. डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे नवनिर्वाचित प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री. पाटील पी.एन. उपस्थित होते.
कार्याक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात अध्यक्ष श्री. सुभाषचंद्रजी सारडा साहेब यांचा सत्कार श्री. शिंदे एस.जी. (मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय रुई) यांनी केला. प्रमुख अतिथी डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांचा सत्कार प्रा. श्रीमती मंत्री एस.ए. यांनी तर प्रमुख पाहुणे श्री. पाटील पी.एन. यांचा सत्कार श्री. पाटील ए.आय. (मुख्याध्यापक, प्रियदर्शनी प्राथमिक विद्यालय बीड) यांनी केला.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री. पाटील पी.एन. यांनी केले. यावेळी त्यांनी प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्टची स्थापना, संस्थेचा उद्देश तसेच संस्थेअंतर्गत येणाऱ्या शाळांच्या प्रगतीचा आढावा मांडला. सत्कारमूर्ती श्रीमती तायडे डी.ओ. यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव, शैक्षणिक कार्य आणि संस्थेतील वाटचालीचा भावनिक आढावा घेतला. प्रा. श्री. गायकवाड आर.एन. यांनी संस्थेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “संस्थेमुळे मला माझ्या मुलांना उच्च शिक्षण देता आले. मी सदैव संस्थेचा ऋणी राहील,” असे मत व्यक्त केले. आपल्या भावना व्यक्त करताना दोन्ही सत्कारमूर्ती भावूक झाले होते.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. आदितीजी सारडा मॅडम यांनी आधुनिक काळात विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत डिजिटल शिक्षणाची जोड देऊन भविष्यासाठी सक्षम बनवण्याची गरज व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात श्री. सुभाषचंद्रजी सारडा साहेब यांनी सत्कारमूर्तींना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्ट हे एक कुटुंब असून आजी-माजी सर्व कर्मचाऱ्यांच्या सुख-दुःखात संस्था सदैव खंबीरपणे उभी राहते. शिक्षकांनी सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व चांगले संस्कार देऊन उद्याचा उत्तम नागरिक घडवावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्याक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जाधव व्ही.पी. व श्रीमती वाघमारे ए.के. यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. इनामदार सर यांनी केले. या सोहळ्याला प्रियदर्शनी एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS