अकोले : अकोले तालुक्यातील घाटघर परिसरातील उंबरदरा येथे सुमारे ३० ते ३२ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्या

अकोले : अकोले तालुक्यातील घाटघर परिसरातील उंबरदरा येथे सुमारे ३० ते ३२ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा मृतदेह सुमारे वीस दिवसांहून अधिक काळ घटनास्थळी पडून असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले आहे. ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला, ते क्षेत्र ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किणवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी दोन्ही संबंधित पोलीस यंत्रणांमध्ये समन्वय सुरू करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी संभाजी सांगळे, मुठे, जाधव व अन्य कर्मचारी दाखल झाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेण्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांची काही काळ प्रतीक्षा करावी लागल्याची माहिती मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी एका अज्ञात महिलेचा सांगाडा आढळून आला होता. त्या प्रकरणाचा गूढ उलगडा अद्याप झालेला नसतानाच, आता उंबरदरा येथे पुन्हा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने अकोले आणि शहापूर परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे.
हा मृतदेह घटनास्थळी कसा आला, या मृत्यूमागे घातपाताची शक्यता आहे का, तसेच मृत व्यक्तीची मूळ ओळख काय, या सर्व बाबींचा पोलीस कसून तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सर्व बाजूंनी चौकशी करत आहे.

COMMENTS