नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. तरोडा बुद्रुक परिसरातील आशीर्वाद नगर व चैतन्यनगर भा

नांदेड : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. तरोडा बुद्रुक परिसरातील आशीर्वाद नगर व चैतन्यनगर भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त आणि गाळमिश्रित पाणी पुरविले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असल्याने आगामी काळात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
मागील चार ते पाच महिन्यांपासून या परिसरामध्ये घरगुती वापरासाठी येणाऱ्या नळाच्या पाण्याचा रंग काळपट झाला असून त्यातून अत्यंत घाणेरडा वास येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर नाहीच, पण साध्या वापरासाठीही अयोग्य आहे. दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, अतिसार, कावीळ आणि टायफॉईडसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, हा दूषित पाणीपुरवठा थेट महापौरांच्या वॉर्डातच होत असल्याने मनपाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भागातील नगरसेवक व खुद्द महापौरांनी या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक केल्याचा आरोप परिसरातील महिलांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत केवळ आश्वासनांची खैरात दिली. पाईपलाईन मधील गळती, सांडपाण्याचे मिश्रण किंवा जलशुद्धीकरण प्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यता आहे. तरोडा परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून पाण्याचे नमुने तपासावेत, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

COMMENTS