संगमनेर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात ये

संगमनेर : माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या ‘मिशन ५० लिटर’ योजनेअंतर्गत तालुक्यातील ५० युवा दूध उत्पादक शेतकरी सात दिवसांच्या पंजाब अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ येथून लोकनेते बाळासाहेब थोरात, चेअरमन रणजीतसिंह देशमुख, आमदार सत्यजित तांबे, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर आणि लक्ष्मणराव कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभ्यास दौऱ्याच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
या सात दिवसांच्या अभ्यास दौऱ्यामध्ये चेअरमन रणजीतसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, डॉ. प्रमोद पावसे, संतोष मांडेकर यांच्यासह तालुक्यातील ३५ युवा उद्योजक, दूध उत्पादक शेतकरी आणि १५ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ दिल्लीवरून पंजाबमधील फिरोजपूर येथे दाखल होणार असून, तेथील आधुनिक व मोठ्या गाय गोठ्यांच्या ‘डेअरी फार्म्स’ला भेटी देणार आहे. यासोबतच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी विशेष व्हेटर्नरी सेमिनार आणि फार्म मॅनेजमेंटचे तीन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
देशात सर्वाधिक दूध उत्पादन पंजाबमध्ये होत असून, तेथील शेतकऱ्यांनी कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन घेण्याचे तंत्र विकसित केले आहे. याच धर्तीवर राजहंस दूध संघाच्या वतीने ‘मिशन ५० लिटर’ राबविण्यात येत आहे. एका गायीपासून दिवसाला ५० लिटर दूध उत्पादन घेण्याची विशेष प्रणाली संघाने तयार केली असून, पुढील सात वर्षांत तालुक्यातील विविध गोठ्यांमध्ये अशा उच्च क्षमतेच्या गाई असतील, असा विश्वास चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.

COMMENTS