देवळाली प्रवरा : गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत आणि निर्भीडपणे सामाजिक सेवा बजावणारे राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, अखिल भ

देवळाली प्रवरा : गेल्या ३५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत आणि निर्भीडपणे सामाजिक सेवा बजावणारे राहुरी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सदस्य व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक (दै. लोकमंथन) राजेंद्र गंगाधर उंडे यांना ‘आधार फाउंडेशन’ आणि ‘एस आर २४ न्यूज’ यांच्या वतीने नुकताच राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात हा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष व ‘दैनिक नवा मराठा’चे संपादक सुभाष गुंदेचा हे होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पत्रकार राजेंद्र उंडे यांना सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राजेंद्र उंडे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक संवेदनशील विषयांवर शोध पत्रकारिता केली आहे. कृषी विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार उघडकीस आणून फेरपरीक्षा घेईपर्यंत त्यांनी केलेला पाठपुरावा, दूध भेसळ प्रकरण आणि शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराची वृत्तमालिका यांद्वारे त्यांनी समाजातील अन्यायाला वाचा फोडली आहे.
या सोहळ्याला नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, शिवाजीराव कपाळे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, ह.भ.प. राधिका खेमनर, संतोष चोळके, विजय तमनर आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार उंडे यांना यापूर्वी आदर्श पत्रकार पुरस्कार (२००६), शोध पत्रकारिता पुरस्कार (२००७), महाराष्ट्र भूषण पत्रकारिता पुरस्कार (२०१०) आणि श्री संत भगवान बाबा पत्रकारिता पुरस्कार (२०१४) यांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या ताज्या यशामुळे अहिल्यानगर आणि राहुरी जिल्ह्यातून त्यांचे भरभरून कौतुक होत आहे.

COMMENTS