गेवराई : बीड जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यातील खाजगी बँका, पतसंस्था तसेच मल्टीस्टेट कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्

गेवराई : बीड जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यातील खाजगी बँका, पतसंस्था तसेच मल्टीस्टेट कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी अत्यंत कणखर आणि पारदर्शक अधिकार्याची नेमणूक करावी. या चौकशीची संपूर्ण जबाबदारी अतिरिक्त प्रभार (चार्ज) स्वरूपात ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवावी, अशी आग्रही मागणी ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ बीड जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी केली आहे.
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. अनिल बोर्डे यांनी नमूद केले की, जिल्ह्यातील अनेक खाजगी बँका आणि पतसंस्थांनी सर्वसामान्य नागरिकांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा केल्या. मात्र, त्यानंतर काही संचालकांनी संगनमत करून या ठेवींचा अपहार केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. या प्रकरणांमधील अनेक मुख्य आरोपी सध्या फरार आहेत.
तपास यंत्रणेला गती देण्यासाठी, बेनामी मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि बुडीत संस्थांच्या मालमत्तेची लिलाव प्रक्रिया वेगाने राबवून गरिबांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कडक अधिकार्याची नितांत गरज आहे. सध्या अनेक गरीब ठेवीदार आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी बँका आणि पोलीस यंत्रणांकडे चकरा मारत असून त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे या संपूर्ण महाघोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष यंत्रणा उभी करावी, अशी ठाम मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.

COMMENTS