मुंबई/अहिल्यानगर : "मुंबईपर्यंत मान्सून आतापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते, पण तो अजून पोहोचलेला नाही" अशी परिस्थिती पूर्वीही अनेक वेळा निर्माण झाली

मुंबई/अहिल्यानगर : “मुंबईपर्यंत मान्सून आतापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते, पण तो अजून पोहोचलेला नाही” अशी परिस्थिती पूर्वीही अनेक वेळा निर्माण झाली आहे. मान्सूनचा केरळपासून महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास हा दरवर्षी सारखा नसतो. काही वर्षी तो झपाट्याने पुढे सरकतो, तर काही वर्षी मधेच थांबतो. भारतीय मान्सून हा एका ठराविक तारखेला सुरू होणारा आणि सरळ उत्तरेकडे जाणारा पाऊस नसून तो महासागर, वातावरणीय दाब, वारे, तापमान, समुद्रपृष्ठीय उष्णता आणि जागतिक हवामान प्रणाली यांच्या परस्परसंबंधातून तयार होणारी अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्यासाठी जे घटक कारणीभूत असतात; त्यात अरबी समुद्रातील ओलावा, सममोसमी वारे, पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाचे क्षेत्र, बंगालच्या उपसागरातील प्रणाली यांपैकी एखाद्या घटकात कमकुवतपणा आला तर मान्सूनचा वेग मंदावू शकतो.
‘अल-निनो’चे संकट आणि इतिहास
काही ठराविक वर्षांप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या ‘अल-निनो’ची चर्चा होत आहे. अल-निनो हा केवळ वातावरणातील बदल नसून समुद्र व वातावरण यांच्यातील संयुक्त हवामान चक्राचा भाग आहे. अल-निनोच्या काळात जागतिक वातावरणीय प्रवाह बदलतात, भारतातील मान्सून कमकुवत पडू शकतो, दुष्काळाची शक्यता वाढते आणि काही भागात उष्णतेच्या लाटा तीव्र होतात.
हे चक्र शेकडो-हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. जुन्या जहाजांच्या नोंदी, हिमस्तरातील नोंदी, वृक्षवलये आणि तलावातील गाळ यांच्या अभ्यासातून गेल्या अनेक शतकांपासून ‘अल-निनो’ आणि ‘ला-निना’ चक्र चालू असल्याचे स्पष्ट दिसते. अल-निनो पूर्णपणे नैसर्गिक आहे, परंतु मानवी क्रियांमुळे निर्माण झालेल्या जागतिक तापमानवाढीमुळे (Global Warming) त्याची तीव्रता बदलू शकते. समुद्र आधीच अधिक गरम झाले आहेत आणि वातावरणात अधिक आर्द्रता आहे. परिणामी, अल-निनो घडल्यास त्याचे परिणाम पूर्वीपेक्षा अधिक तीव्र जाणवू शकतात.
हवामानावर कृत्रिम नियंत्रण शक्य आहे का?
‘हवामानावर कृत्रिम नियंत्रण शक्य आहे का?’ हा सध्याचा सर्वात वादग्रस्त प्रश्न आहे. आज जगात काही प्रकारचे हवामान बदलण्याचे प्रयोग होतात. ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाइड किंवा मिठाचे सूक्ष्म कण फवारून ‘क्लाउड सीडिंग’ (कृत्रिम पाऊस) केले जाते. पाऊस वाढवणे, गारपीट कमी करणे, धुके कमी करणे आदी प्रयोग अमेरिका, चीन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील काही राज्यांनी केले आहेत. परंतु, त्यांचा परिणाम अत्यंत मर्यादित क्षेत्रात, काही तास किंवा काही दिवसांसाठीच असतो. हे तंत्रज्ञान अजूनही प्रयोगात्मक पातळीवरच आहे.
मान्सून रोखणे कोणत्याही देशाच्या हातात नाही!
सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार, एखादा देश किंवा संस्था भारतीय मान्सून नियंत्रित करू शकते का? तर याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. भारतीय मान्सून हा हिंद महासागर, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिमालय आणि पॅसिफिक महासागर यांच्या एकत्रित परस्परक्रियेतून तयार होतो. मानवाकडे इतक्या मोठ्या जागतिक प्रणालीवर नियंत्रण ठेवण्याची तंत्रज्ञान क्षमता अद्याप नाही.
हवामानातील वाढती अनिश्चितता, अचानक होणारी अतिवृष्टी, दीर्घ कोरडे कालखंड आणि उष्णतेच्या लाटांमुळे सामान्य लोकांमध्ये ‘काहीतरी कृत्रिम हस्तक्षेप होत असावा’ अशी शंका किंवा भावना निर्माण होऊ शकते. परंतु, महाराष्ट्रातील मान्सून कोणीतरी थांबवला आहे, असे म्हणण्यासाठी कोणताही विश्वासार्ह वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
बदलत्या निसर्गाचे मानवाला आव्हान
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर महाराष्ट्रातील मान्सूनचा संभाव्य विलंब हा जागतिक हवामान प्रणालीतील नैसर्गिक चढउतार, समुद्रपृष्ठीय तापमानातील बदल आणि दीर्घकालीन हवामान बदल (Climate Change) यांच्या संयुक्त परिणामातून घडतो. उपलब्ध पुराव्यांनुसार, हा प्रकार कोणत्याही आंतरराष्ट्रीय वातावरणीय प्रयोगांचा खेळ असल्याचा निष्कर्ष काढण्यास कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
त्यामुळे यंदा पाऊस कमी होऊन दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली तर ती नैसर्गिक असेल. मात्र, एक गोष्ट नक्की की, भारतातील वने ज्या बेछूट पद्धतीने नष्ट केली जात आहेत, त्याचाही हा विपरीत परिणाम असू शकतो. वातावरणातील समतोल राखण्यासाठी आता संपूर्ण मानव समाजाला पर्यावरणाप्रती कटिबद्ध राहावेच लागेल!


COMMENTS