सोनई : महाराष्ट्रात उत्पादन, साठवणूक व विक्रीस पूर्णपणे बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा बाळगून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका तरुणाविरुद्ध सोनई पोली

सोनई : महाराष्ट्रात उत्पादन, साठवणूक व विक्रीस पूर्णपणे बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा बाळगून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका तरुणाविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ५३ हजार ३५० रुपयांचा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त केला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुहास भुसारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनई-राहुरी मार्गावरील महावितरण उपकेंद्र परिसरातील आरोपीच्या राहत्या घरावर अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. यावेळी घराच्या दोन खोल्यांमध्ये विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान वेगवेगळ्या रंगांच्या वेष्टनातील सुगंधी तंबाखूची ५०० ग्रॅम आणि ५ किलो वजनाची अनेक पाकिटे असा एकूण ५३,३५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सुगंधी तंबाखू व तयार मावा विक्रीवर बंदी असतानाही, मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या या पदार्थांचा केवळ आर्थिक फायद्यासाठी साठा केल्याचे समोर आले आहे. सोनई पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS