Homeताज्या बातम्या

पावसाळ्याची चाहूल, सावधगिरीची गरज : बीड जिल्ह्यात नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी

बीड : उन्हाळ्याच्या कडक झळा संपताच सर्वांनाच पावसाच्या आगमनाची उत्सुकता लागते. काळेभोर ढग, मातीचा दरवळणारा सुगंध आणि हिरवाईची चादर हे पावसाळ्याचे

श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
कृषीसाहित्य विक्रेता संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तिसर्‍यांदा मनमोहन कलंत्री बिनविरोधजिल्हा व तालुका संघटनेच्या वतीने सत्कार
कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)


बीड : उन्हाळ्याच्या कडक झळा संपताच सर्वांनाच पावसाच्या आगमनाची उत्सुकता लागते. काळेभोर ढग, मातीचा दरवळणारा सुगंध आणि हिरवाईची चादर हे पावसाळ्याचे आकर्षण असले तरी या ऋतूत विविध नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागतो. हवामान बदलाच्या परिणामांमुळे गेल्या काही वर्षांत पावसाचे स्वरूप अधिक अनिश्चित झाले असून अचानक मुसळधार पाऊस, वीजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि अतिवृष्टीमुळे जीवित व वित्तहानीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
परंपरेने दुष्काळी पट्ट्यात गणला जाणारा बीड जिल्हा अलीकडील काळात अल्पावधीत होणार्‍या अतिवृष्टीचा अनुभव घेत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बीड जिल्ह्याचा सरासरी वार्षिक पाऊस सुमारे 650 ते 700 मि.मी. दरम्यान असतो. मात्र बदलत्या हवामानामुळे काही भागांत कमी तर काही भागांत अतिवृष्टी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत वीज पडणे ही गंभीर नैसर्गिक आपत्ती ठरत आहे. महाराष्ट्रात दरवर्षी शेकडो नागरिकांचा मृत्यू वीज पडल्याने होतो. शेतात काम करताना, जनावरे चारताना किंवा झाडाखाली आसरा घेताना दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. विजांचा कडकडाट सुरू झाल्यास तात्काळ सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. झाडाखाली उभे राहणे, उघड्या मैदानात थांबणे तसेच विद्युत खांब आणि धातूच्या वस्तूंच्या जवळ जाणे टाळावे. शेतातील मोटारपंप, ट्रॅक्टर आदींपासून सुरक्षित अंतर ठेवावे. ‘दामिनी’सारख्या अधिकृत मोबाईल पद्वारे वीज पडण्याच्या संभाव्य धोक्याची पूर्वसूचना मिळू शकते. पावसाळ्यातील आणखी एक धोका म्हणजे वादळी वार्‍यांमुळे घरांची पडझड. ग्रामीण भागात पत्र्याची किंवा कच्च्या स्वरूपाची घरे मोठ्या प्रमाणावर असल्याने घरांची छप्परे, पत्रे, खिडक्या-दरवाजे आणि विद्युत जोडण्यांची तपासणी करून घ्यावी. घराभोवती पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे आणि नाले स्वच्छ ठेवावेत. धोकादायक झाडे व फांद्या वेळेत छाटाव्यात. टॉर्च, प्राथमिक उपचार पेटी, आवश्यक औषधे आणि आपत्कालीन संपर्क क्रमांक घरात उपलब्ध ठेवावेत. शेती आणि पशुपालन हे बीड जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे मुख्य आधार आहेत. त्यामुळे जनावरांची सुरक्षा महत्त्वाची आहे. गुरे, म्हशी, शेळ्या आणि मेंढ्या उघड्यावर बांधून ठेवू नयेत. गोठ्यांची छप्परे मजबूत असावीत आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित लसीकरण करावे. भिजलेला किंवा बुरशी लागलेला चारा जनावरांना देऊ नये. शेतकर्‍यांसाठी पावसाळा हा नव्या हंगामाची सुरुवात असतो. सोयाबीन, कापूस, तूर, बाजरी, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांच्या पेरणीपूर्वी बियाण्यांची गुणवत्ता तपासणे, शेतातील बांध व नाल्यांची दुरुस्ती करणे आणि पाण्याच्या निचर्‍याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सर्पदंशाचा धोका लक्षात घेऊन शेतात काम करताना गमबूट किंवा पायांचे संरक्षण करणारी साधने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाचे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पूरप्रवण भागात अनावश्यक हालचाल टाळावी आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी आपत्ती व्यवस्थापन ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद करत घरांची दुरुस्ती, नाल्यांची स्वच्छता आणि धोकादायक झाडांची छाटणी वेळेत करण्याचे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्ष, महसूल, आरोग्य, पशुसंवर्धन आणि वीज वितरण विभागांना सतर्क ठेवले असल्याची माहिती दिली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर अवलंबून राहावे, असे त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी महिलांना, विद्यार्थ्यांना आणि शेतकरी कुटुंबांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले. पाण्याखाली गेलेले रस्ते ओलांडू नयेत आणि मुलांना नाल्यांजवळ खेळू देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शेतकरी व ग्रामस्थांना शेतातील बांध, नाले आणि पाण्याचा निचरा होणारे मार्ग वेळेत दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदत योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. पावसाळा हा निसर्गाचा उत्सव असला तरी तो सुरक्षिततेच्या चौकटीत साजरा होणे गरजेचे आहे. प्रशासन, नागरिक, शेतकरी आणि पशुपालक यांनी समन्वयाने काम केल्यास वीज, वादळ, अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते.

COMMENTS