Homeताज्या बातम्या

तृणमूलला धक्का; खा. सुष्मिता देव यांचा राजीनामा

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि असंतोषाच्या चर्चांना नव्याने उधाण आले असून पक्षाच्या राज्यसभा सदस्

काँग्रेसने महिला आरक्षणात विनाकारण खोडा घातला : चव्हाण
दुहेरी नागरिकत्व प्रकरणी राहूल गांधी यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे हायकोर्टाचे आदेश
राहुरी पोटनिवडणुकीसाठी 103 उमेदवारी अर्जांची खरेदी


नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि असंतोषाच्या चर्चांना नव्याने उधाण आले असून पक्षाच्या राज्यसभा सदस्य सुष्मिता देव यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाच्या नेतृत्वासमोरील आव्हाने आणखी वाढल्याचे मानले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसमध्ये काही वरिष्ठ नेते आणि लोकप्रतिनिधी नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यातच सुष्मिता देव यांच्या राजीनाम्याने पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. यापूर्वी राज्यसभेतील पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रमुख प्रतोद राहिलेले सुखेंदू शेखर रॉय यांनीही पक्षाशी फारकत घेतली होती. त्यामुळे पक्षातील अस्वस्थता अधिक स्पष्टपणे समोर येत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. पक्षात फूट पडू नये आणि नाराज गटांशी संवाद कायम राहावा यासाठी पक्षप्रमुख तथा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांतील राजकीय समीकरणांबाबतही चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी लोकसभा सदस्य काकोली घोष दस्तीदार यांनीही पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला होता. त्यांनी पक्षातील अनेक खासदार आपल्या भूमिकेशी सहमत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तृणमूलमधील अंतर्गत घडामोडींकडे राजकीय विश्‍लेषकांचे विशेष लक्ष लागले आहे. सुष्मिता देव यांनी राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र पाठवून सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. आपल्या पत्रात त्यांनी राज्यसभा सदस्यपदाचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली आहे. राजीनाम्यामागील सविस्तर कारणे मात्र त्यांनी सार्वजनिकरित्या स्पष्ट केलेली नाहीत. सुष्मिता देव यांनी 2021 मध्ये काँग्रेस पक्षाचा निरोप घेऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्या अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या प्रमुख म्हणून कार्यरत होत्या. आसाममधील सिलचर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्वही त्यांनी केले आहे. राजकारणातील त्यांचा अनुभव आणि ईशान्य भारतातील प्रभाव लक्षात घेता त्यांच्या राजीनाम्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS