Homeताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा : मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच

..ही तर मोदी सरकारच्या अपयशाची कबुली : खा. राहुल गांधी
गेमिंग प्लॅटफॉर्म गेम्सक्राफ्टच्यातीन संस्थापकांना ईडीने केली अटक
दिल्लीत तापत्या उन्हात बेरोजगार तरुणांचे ‘कॉकरोच’ आंदोलन; “रोजगार द्या किंवा सत्ता सोडा” घोषणाबाजीतून सरकारला दिला थेट इशारा!


नवी दिल्ली : नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. देशाचे निर्वाचित प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवा देण्याचा 4 हजार 399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीचे 4 हजार 399 दिवस हे केवळ कालगणनेतील आकडे नसून हा कालावधी भारताच्या सर्वांगीण विकासाचे एक महत्त्वपूर्ण पर्व असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या कालावधीत देशातील कोट्यवधी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्याचे महत्त्वाचे कार्य झाले. देशात रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, द्रुतगती महामार्ग आणि आधुनिक पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व जाळे उभारण्यात आले. भारताने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेत जगातील अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये स्थान निर्माण केले आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी सिंचन प्रकल्पांना चालना देण्यात आली, जलसंधारण आणि कृषी विकासासाठी विक्रमी गुंतवणूक करण्यात आली.
‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र आज देशभर दिसून येते. संरक्षण क्षेत्रात भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत जगासमोर आपली क्षमता सिद्ध केली आहे. एकेकाळी शस्त्रास्त्रांची मोठ्या प्रमाणात आयात करणारा भारत आज हजारो कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करणारा देश ठरला आहे. यूपीआय आणि डिजिटल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून भारताने जगासमोर डिजिटल क्रांतीचा आदर्श निर्माण केला आहे. ‘विकास भी और विरासत भी’ या ध्येय वाक्याला केंद्रस्थानी ठेवून पंतप्रधान मोदी यांनी विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा समतोल साधण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. महाराष्ट्राला गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान मोदी यांचे भरीव सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील अनेक महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प, वाढवण बंदर, महामार्गांचे विस्तृत जाळे, मेट्रो प्रकल्प, रेल्वे आधुनिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. पूर्वी केवळ कागदावर असणारे प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडवताना दाखवलेली संवेदनशीलता खरोखरच कौतुकास्पद आहे.
नीती आयोगाची आज बैठक
नीती आयोगाच्या 11 व्या नियामक परिषदेची बैठक गुरुवारी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्ये आणि केंद्र यांच्यातील समन्वय वाढवणे, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, सुशासन, भागीदारी आणि डेटा-आधारित प्रणालींचा अधिक चांगला वापर यावर चर्चा होणार असून या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत दाखल झाले आहेत.

COMMENTS