Homeताज्या बातम्या

राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर

कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
नांदुर गावामध्ये कृषीदुतांचे आगमन


संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. आता पाणी उपलब्ध झाले असले तरी कालव्यांच्या काँक्रिटीकरणामुळे पाणी पुढे वाहून जात आहे. निळवंडेचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. सत्तेत असणाऱ्यांनी आपल्या तालुक्याचे पाणी जपणे आणि वाढविणे ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. पाण्याच्या प्रश्नाकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
चिंचोली गुरव येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पाईपद्वारे भरलेल्या बंधाऱ्याच्या जलपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, संचालक संपतराव गोडगे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
 थोरात म्हणाले, की निळवंडेचे पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे स्वप्न होते. या पाण्यापासून कुणीही वंचित राहू नये, या उद्देशाने नियोजन करण्यात आले. कालव्याच्या वरच्या भागालाही पाणी पोहोचावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सध्या कालव्यांच्या काँक्रिटीकरणामुळे पाण्याच्या प्रवाहाबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्या हक्काचे पाणी जपणे आणि वाढविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. पाण्याची लढाई असेल तर राजकारण बाजूला ठेवून त्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
 राजकीय विषयावर बोलताना थोरात यांनी भाजपवर टीका केली. सत्ता मिळविण्यासाठी धर्माचा वापर केला जात असून सध्याची राजकीय दिशा चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी जनतेवर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 यावेळी संपतराव गोडगे यांनी कारखान्याच्या माध्यमातून विविध गावांमध्ये पाईप उपलब्ध करून देण्यात आल्याने पाणीटंचाई कमी झाल्याचे सांगितले. देवकवठे, करुले, लोहारे, वडझडीसह अनेक गावांमध्ये पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
 कार्यक्रमास चिंचोली गुरव व परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास सोनवणे यांनी केले, तर आभार वाल्मीक गोडगे यांनी मानले.

COMMENTS