कर्जत : स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना घराचा हक्क मिळालेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठ

कर्जत : स्वातंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होऊनही भटके-विमुक्त समाजातील अनेक कुटुंबांना घराचा हक्क मिळालेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठीही जागा उपलब्ध नसल्याची विदारक स्थिती असून, या समाजाची प्रभावी घरगणना व जनगणना व्हावी, यासाठी राज्यभर चर्चेत असलेली ‘मुशाफिरी यात्रा’ सध्या सुरू आहे. भटके-विमुक्त समाजाचे नेते ऍड. डॉ. अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी माहिजळगाव, पाटेवाडी, हंडाळवाडी, कर्जत, भांडेवाडी, राशीन, बाभुळगाव दुमाला, पिंपळवाडी आणि कुळधरण येथे भटके-विमुक्त व आदिवासी समाजाच्या पालांवर, तांड्यांवर आणि झोपड्यांमध्ये जाऊन संवाद साधण्यात आला.
माहिजळगाव येथे नाथपंथी डवरी गोसावी, वडार समाज तसेच तेलंगणा राज्यातून उपजीविकेसाठी आलेल्या कुटुंबांशी चर्चा करण्यात आली. या ठिकाणी १६० हून अधिक समाजबांधव उपस्थित होते. घरगणना व जनगणनेसाठी कोणताही शासकीय कर्मचारी आलेला नसल्याची माहिती उपस्थितांनी दिली. अनेक कुटुंबे गेल्या सहा महिन्यांपासून पालांमध्ये वास्तव्यास असूनही शासकीय योजनांपासून वंचित असल्याचे वास्तव यावेळी समोर आले.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड. डॉ. अरुण जाधव म्हणाले, ‘‘देशभर घरगणना आणि जनगणना सुरू असताना डोंगर, जंगल, तांडे आणि पालांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त समाजापर्यंत ही प्रक्रिया पोहोचत नाही. परिणामी शासनाच्या नोंदीतच या समाजाचे अस्तित्व दिसून येत नाही. भविष्यात नागरिकत्व, शासकीय योजना आणि विविध हक्कांसाठी हा मोठा अडथळा ठरू शकतो.’’
ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या सचिव उमा जाधव यांनी महिलांशी संवाद साधताना भटकंतीमुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले. तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर असल्याने शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापूसाहेब ओहोळ यांनी भटके-विमुक्त समाजाची संपूर्ण घरगणना व जनगणना होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या समाजाची अधिकृत नोंद झाली नाही तर भविष्यात अनेक प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गंभीर अडचणी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, हंडाळवाडी, राशीन, पिंपळवाडी आणि कुळधरण येथेही यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डवरी गोसावी, वडार, भिल्ल, पारधी, कैकाडी, तिरमली, मरीआईवाले यांच्यासह विविध भटक्या समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात तुकाराम पवार, शितल पवार, ललिता पवार, राहुल पवार, रेश्मा बागवान, ऋषी गायकवाड, चंपा पवार, काजुरी पवार, उत्तम सावंत आणि नवनाथ शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.

COMMENTS