जवळा : इयत्ता दहावीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन, प

जवळा : इयत्ता दहावीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. कठोर परिश्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि समाजाकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे यशाचा मार्ग सुकर होत असतो. याच पार्श्वभूमीवर सांगवी सूर्या येथील रोशनी अरुण गायकवाड, वैष्णवी आढाव आणि करण अरुण गायकवाड यांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
श्री धर्मनाथ विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी. बी. शिंदे यांच्या संकल्पनेतून व ज्येष्ठ शिक्षक एस. एम. काळे यांच्या नियोजनातून ग्रामपंचायत कार्यालयासमोर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच मोहन आढाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिर्के व गुंजाळ, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ तसेच विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी काळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. शिर्के यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन व्यक्त केले, तर गुंजाळ यांनी मराठी शाळा व ग्रामस्थांच्या योगदानाचा गौरव केला. प्राचार्य शिंदे यांनी विद्यालयाची गुणवत्ता, शैक्षणिक वाटचाल आणि सातत्याने मिळत असलेल्या यशाची माहिती दिली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी विद्यालय, कुटुंब आणि गावाचा नावलौकिक वाढवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून विद्यालय, विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. असे उपक्रम सातत्याने राबविण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली. आभार प्रदर्शन काळे यांनी केले.

COMMENTS