मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील राजकीय संघर्ष आता अधिक उघडपणे समोर येऊ लागला आहे. विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील राजकीय संघर्ष आता अधिक उघडपणे समोर येऊ लागला आहे. विधान परिषदेवर अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर थेट टीका करत अनेक राजकीय मुद्द्यांवर प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी रोहित पवार यांनी पक्ष आणि नेतृत्वाबाबत केलेल्या वक्तव्यांवरही आक्षेप घेतला.
अनिकेत तटकरे यांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या कथित ‘घोडेबाजार’च्या आरोपांना फेटाळून लावले. निवडणुकीतील निकाल स्वीकारण्याची राजकीय संस्कृती विरोधकांनी जोपासावी, असे ते म्हणाले. पराभवानंतर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्याची परंपरा लोकशाहीत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. रोहित पवार यांनी तटकरे कुटुंबावर केलेल्या टीकेचा संदर्भ देत सुनील तटकरे म्हणाले की, वैयक्तिक पातळीवरील टीका टाळली पाहिजे. जनतेच्या विश्वासातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद मांडताना संयम राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वतःला रायगड जिल्ह्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले असल्याची आठवण करून देत त्यांनी रोहित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. रोहित पवार यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संबंधांबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सुनील तटकरे यांनी काही जुने राजकीय संदर्भ उपस्थित केले. भाजपची उमेदवारी मिळविण्यासाठी पूर्वी कोणकोणत्या स्तरावर प्रयत्न झाले आणि त्यासाठी कोणत्या नेत्यांच्या भेटी घेतल्या गेल्या, याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.

COMMENTS