रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ल्यावर शनिवारी अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. र

रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ल्यावर शनिवारी अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यासह देशाच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त आणि शिवप्रेमींनी रायगडावर उपस्थिती लावत स्वराज्याच्या या ऐतिहासिक सोहळ्याला मानाचा मुजरा अर्पण केला. महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला असून विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवभक्तांच्या निष्ठा आणि समर्पणाचे कौतुक केले. रायगडावर जमलेल्या जनसमुदायाचा उल्लेख करताना त्यांनी, हा केवळ लोकांचा महासागर नसून ‘शिवसागर’ असल्याचे सांगितले. गडावरील मर्यादित सुविधा, निवास आणि भोजनाच्या अडचणी असूनही अनेक दिवस मुक्काम करून हजारो शिवभक्त सोहळ्यासाठी उपस्थित राहतात, हीच छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेली अपार श्रद्धा असल्याचे त्यांनी नमूद केले.
संभाजीराजे म्हणाले की, अनेक अडचणींचा सामना करत केवळ महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांचे समर्पण प्रेरणादायी आहे. तीनशे वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतरही एका राजाबद्दल अशी भावना आणि निष्ठा टिकून राहणे, ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब आहे. आपण महाराजांचे विचारांचे वारसदार आहोत, तसेच या शिवभक्तांच्या श्रद्धेलाही वंदन करण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, ६ जून १६७४ हा दिवस केवळ एका राजाच्या राज्याभिषेकाचा नव्हता, तर स्वराज्याच्या नव्या युगाचा प्रारंभ होता. रायगडावरील ज्या ठिकाणी आज महाराजांचा पुतळा उभारलेला आहे, त्याच ठिकाणी छत्रपती पदाची स्थापना झाली होती. परकीय सत्तांना आणि गुलामगिरीच्या मानसिकतेला आव्हान देत महाराजांनी स्वतंत्र राज्यव्यवस्था निर्माण केली. त्यामुळे हा दिवस भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला स्वतंत्र ओळख देत नव्या कालगणनेची सुरुवात केली. स्वाभिमान, न्याय आणि लोककल्याण यांवर आधारित राज्य उभे करून त्यांनी जनतेसमोर आदर्श शासनव्यवस्थेचे उदाहरण निर्माण केले, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन संबोधित विशेष भूमिका मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले, हा इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. मात्र त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांविरोधात संघर्ष करून स्वराज्याची स्थापना केली आणि जनतेमध्ये स्वाभिमानाची भावना जागवली. विविध सत्तांच्या जोखडातून समाजाला मुक्त करून स्वतंत्र राज्य उभारण्याचा संदेश दिला. त्यामुळे स्वराज्य स्थापनेचा आणि राज्याभिषेकाचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा प्रारंभबिंदू मानला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

COMMENTS