मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांन

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ‘निपुण सेतू’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘प्रतिभा सेतू’ संकल्पनेच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
दरवर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरत असले तरी उपलब्ध पदांची संख्या मर्यादित असल्याने अनेक गुणवंत उमेदवार अंतिम निवडीतून वंचित राहतात. मात्र या उमेदवारांकडे उच्च शैक्षणिक पात्रता, विश्लेषणात्मक क्षमता, नेतृत्वगुण आणि सार्वजनिक सेवेसाठी आवश्यक असलेली जिद्द व कौशल्ये असतात. या गुणवत्तेचा उपयोग राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी व्हावा, या उद्देशाने ‘निपुण सेतू’ची निर्मिती करण्यात आली आहे. उद्योग विभागाने विकसित केलेल्या ‘मैत्री 2.0’ या एकखिडकी प्रणालीअंतर्गत हा उपक्रम कार्यान्वित केला जाणार आहे. राज्यातील खाजगी उद्योग, उद्योजक, विविध कंपन्या तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना सक्षम मनुष्यबळ सहज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट यामागे आहे. मंत्रिमंडळाने एप्रिल 2026 मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शासनाने त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या उपक्रमाचा लाभ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कोणत्याही परीक्षेतील अंतिम टप्पा गाठलेल्या, परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी अशा अंतिम प्रक्रियेपर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांचा यात समावेश होईल. शासन निर्णय प्रसिद्ध झाल्यापासून पुढे होणार्या सर्व परीक्षांसाठी हा उपक्रम अनिवार्यपणे लागू राहणार आहे. याशिवाय, मागील एका वर्षातील परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या उमेदवारांची माहितीही त्यांच्या संमतीनंतर आणि तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास या व्यवस्थेत समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे पूर्वी निवडीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांनाही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. ‘निपुण सेतू’वर उमेदवारांचे नाव, जन्मवर्ष, शैक्षणिक पात्रता, विशेष प्राविण्य, कामाचा अनुभव, संबंधित परीक्षेचे नाव, अंतिम टप्प्यात मिळालेले गुण यांसारखी माहिती उपलब्ध असेल. तसेच भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-पत्र पत्ता यांसारखे संपर्क तपशील केवळ अधिकृत नियोक्त्यांनाच पाहता येणार आहेत. या उपक्रमामुळे शासनाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या, मात्र अंतिम निवडीपासून दूर राहिलेल्या हजारो गुणवंत युवक-युवतींना खाजगी आणि औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मानले जात आहे. ‘निपुण सेतू’ हा उपक्रम राज्यातील कुशल मनुष्यबळ आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील दुवा ठरणार असून रोजगारनिर्मितीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS