लोणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या प्रवरा ग्रामीण अभिय

लोणी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी (Mechanical Engineering) आणि माहिती तंत्रज्ञान (Information Technology) या दोन अभ्यासक्रमांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे (NBA) मानांकन प्राप्त झाले असून, संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक झाल्या आहेत. यापूर्वी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार, उपकरण व नियंत्रण, स्थापत्य, रासायनिक आणि संगणक अभियांत्रिकी या पाच शाखांना राष्ट्रीय मानांकन मंडळाचे मानांकन प्राप्त झाले होते. नव्याने दोन शाखांचा समावेश झाल्याने महाविद्यालयातील एकूण सात अभ्यासक्रम मानांकित झाले आहेत.
तसेच काही महिन्यांपूर्वीच महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेचा (NAAC) ‘अ’ दर्जाही प्राप्त झाला आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांच्या बाबतीत महाविद्यालयाने आपले उच्च स्थान अधोरेखित केले आहे.

COMMENTS