बीड : शहरातील आदित्य फिजिओथेरपी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान वृद्धिंगत करण्यासोबतच त्यांच्यात उत्कृष्ट क्लीनिकल आणि व्यावसायिक

बीड : शहरातील आदित्य फिजिओथेरपी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान वृद्धिंगत करण्यासोबतच त्यांच्यात उत्कृष्ट क्लीनिकल आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने मूलभूत तत्त्वांपासून ते थेट रुग्णांच्या प्रत्यक्ष सेवेपर्यंतचे मूल्यमापन या विषयावर एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.या भव्य कार्यशाळेत शेकडो विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत थेट रुग्णसेवेचे आणि आधुनिक उपचार पद्धतींचे तांत्रिक धडे गिरवले.या महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे उद्घाटन आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या हस्ते करण्यात आले.
आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सलग सहा तास चाललेल्या या अभ्यासपूर्ण सत्राला प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक म्हणून डॉ. सुमय्या झरीन शेख (झढ, झहऊ) उपस्थित होत्या. व्यासपीठावर संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा, डॉ. सुमय्या झरीन शेख, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राध्यापक डॉ. धनश्री टाकसाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या पदावर जाण्यासाठी प्रेरित करताना सांगितले की, स्वप्न पाहणे सोपे असते, पण ती पूर्ण करण्यासाठी अपार मेहनत आणि जिद्द असावी लागते. महाविद्यालयाचे प्रा. बहिरवाळ यांनी मनोगतात स्पष्ट केले की,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. फिजिओथेरपी क्षेत्रात रोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्याने विद्यार्थ्यांनी सतत नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती ठेवून संशोधन आणि प्रात्यक्षिकांमध्ये सक्रिय राहावे, ज्यामुळे व्यावसायिक जीवनात यश मिळेल. या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव मांडले. चतुर्थ वर्षातील विद्यार्थी विशाल पवार याने महाविद्यालयातील आपला प्रवास सांगताना, संस्था व महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते अशी कृतज्ञता व्यक्त केली. तर माधवी भगत हिने महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन चतुर्थ वर्षाची विद्यार्थिनी माधवी भगत हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्वेतजा चोपडे, डॉ. धनश्री टाकसाळ, डॉ. संदेश दळवी, डॉ. रजनी शिंदे, प्रा. राठोड आरती, प्रा. गौड ब्रम्हणी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रथम ते चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
फिजिओथेरपी हे रुग्णांना नवजीवन देणारे माध्यम : डॉ. सुमय्या शेख
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या डॉ. सुमय्या झरीन शेख म्हणाल्या की, फिजिओथेरपी हे केवळ उपचाराचे क्षेत्र नसून रुग्णांना नवजीवन देणारे एक पवित्र माध्यम आहे. आधुनिक काळात याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपचार पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, संशोधन आणि रुग्णसेवा यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत रुग्णसेवा हीच खरी समाजसेवा असल्याचे त्या म्हणाल्या.

COMMENTS