Homeताज्या बातम्या

राहुरीत रहस्यमय ड्रोनचे गूढ अधिक गडद; अँटी-ड्रोन पथकाची कारवाई निष्फळ, आकाशात १० ड्रोन दिसल्याचा दावा

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद ड्रोनच्या गूढतेत रविवारी रात्री आणखी भर पडली

पोहेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात; नितीनराव औताडे यांच्याकडून कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन
रुढींना फाटा देत ‘देहदानाचा’ आदर्श! वडिलांचे पार्थिव वैद्यकीय शिक्षणासाठी दान; राहात्यातील गांधी कुटुंबाचा निर्णय
संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद ड्रोनच्या गूढतेत रविवारी रात्री आणखी भर पडली. प्रशासनाने प्रथमच अँटी-ड्रोन यंत्रणेच्या माध्यमातून या ड्रोनचा मागोवा घेऊन त्यांना निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित ड्रोन अत्यंत उंचीवर असल्याने ही कारवाई यशस्वी ठरली नाही. तरीही आकाशात प्रत्यक्ष ड्रोन उडत असल्याची खात्री प्रशासन व नागरिकांना झाल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.

रविवारी रात्री राहुरी परिसरातील अनेक नागरिकांच्या दृष्टीस आकाशात वेगाने हालचाल करणारे संशयास्पद ड्रोन पडले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्काम सुदर्शन यांनी पुणे येथील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून विशेष अँटी-ड्रोन पथकाची मदत घेतली.

त्यानंतर देवळाली प्रवरा-त्रिंबकपूर मार्ग परिसरात राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. पुण्यावरून आलेल्या अँटी-ड्रोन पथकाने अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने ड्रोनचा मागोवा घेत त्यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पथकातील तज्ज्ञ संदीप जगताप यांनी ड्रोन निष्क्रिय करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना केल्या. मात्र, संबंधित ड्रोन उपकरणांच्या कार्यकक्षेपेक्षा अधिक उंचीवर असल्याने त्यांना पाडणे अथवा नियंत्रणात आणणे शक्य झाले नाही.

या मोहिमेदरम्यान पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी आकाशात एक-दोन नव्हे तर जवळपास दहा ड्रोन फिरताना पाहिल्याचा दावा केला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या केवळ अफवांना पूर्णविराम मिळाला असून परिसरात प्रत्यक्ष ड्रोन उडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, ड्रोनचा परिसरातील चोरीच्या घटनांशी किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारी कारवायांशी थेट संबंध असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेत पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस, पत्रकार शिवाजी घाडगे तसेच अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.

ड्रोन दिसत आहेत, पण उद्देश अद्याप अस्पष्ट प्रशासनाच्या अँटी-ड्रोन मोहिमेमुळे आकाशात ड्रोन असल्याचे स्पष्ट झाले असले तरी ते कोणाच्या मालकीचे आहेत, कोणत्या कारणासाठी उडविले जात आहेत आणि त्यांचा कोणत्याही संशयास्पद हालचालींशी संबंध आहे का, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत हे रहस्य कायम राहणार आहे.

COMMENTS