मुंबई : जनतेची दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती आणि चुकीच्या पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या औषध साठ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FD

मुंबई : जनतेची दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती आणि चुकीच्या पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या औषध साठ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सात विभागांतील बारा आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर छापे टाकून तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला प्रशासनाकडून कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्त मुंढे यांनी दिला. भ्रामक आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, तसेच नियमबाह्य औषध निर्मिती व विक्री यांविरुद्धची कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण स्वरूपात सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औषधे व जादुटोणाविरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट न्यायालयीन कारवाई केली जाणार असून सुरक्षित अन्न व औषधे उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही औषधाविषयी करण्यात आलेल्या आकर्षक अथवा चमत्कारिक दाव्यांवर विश्वास ठेवू नये आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान हरिद्वार येथील एका औषध उत्पादक कंपनीच्या विविध औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला आहे.
राज्यातील सात विभागांत जप्त झालेला औषध साठा
- कोकण विभाग : १८ लाख ५८ हजार रुपये
- पुणे विभाग : १४ लाख ६८ हजार ९८१ रुपये
- नागपूर विभाग : ७ लाख २६ हजार ७५५ रुपये
- नाशिक विभाग : ७ लाख १० हजार ९४५ रुपये
- बृहन्मुंबई : १ लाख ८५ हजार ६०० रुपये
- अमरावती विभाग : १ लाख ४२ हजार २२९ रुपये
- छत्रपती संभाजीनगर विभाग : ४८ हजार ७१८ रुपये

COMMENTS