जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून अंतरावली येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्य
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून अंतरावली येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, उपोषणादरम्यान उष्माघातामुळे काही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारवर राहील, असे म्हटले आहे.
अंतरावली येथे माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारला पुरेसा वेळ देण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून समाज संयम बाळगत असूनही ठोस निर्णय होत नसल्याने आता कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ३० मेपासून उन्हातच उपोषण सुरू करण्यात येणार असून कोणतीही सवलत स्वीकारली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. उपोषणादरम्यान पाणी किंवा अन्य कोणतीही सुविधा घेणार नसून आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करताना जरांगे पाटील म्हणाले की, समाजातील तरुणांना शिक्षण व नोकरीच्या संधींसाठी आरक्षणाची गरज आहे. मात्र, या मागणीबाबत सरकारकडून सातत्याने विलंब होत असल्याने समाजामध्ये असंतोष वाढत आहे. समाजाच्या हितासाठी आता अधिक संघर्ष करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले. सरकारमधील काही मंत्री मराठा समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात; मात्र अशा मंत्र्यांनाही राजकीयदृष्ट्या लक्ष्य केले जाते, असा आरोप त्यांनी केला. सरकारमधील विविध घटकांमध्ये या विषयावर एकमत नसल्याचेही त्यांनी सूचित केले.

COMMENTS