मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक

मुंबई : शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली होती. बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती राजकीय पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करत धुनष्यबाण हाती घेतला. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, “आपल्यातून जो गेला तो देखील जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून मंत्री केलं ही माझी चूक होती.”
उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही देखील त्यांच्या घरी जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंनी मला तेव्हा कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, पण देताना राज्यमंत्रिपद दिलं’, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे यांच्याकडून अशा वक्तव्याची मला अपेक्षा नव्हती. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आधी मुख्यमंत्री झाले की मी आधी राज्यमंत्री झालो? उद्धव ठाकरे यांनी माझ्या या प्रश्नावर विचार करावा. मला त्यांच्याकडून या उत्तराची अपेक्षा आहे. मला सांगा जेव्हा हे (महाविकास आघाडी) सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरू होत्या, तेव्हा मुख्यमंत्री नेमकं कोणत्या पक्षाचा होणार? याबाबत सगळीकडे संभ्रम होता. तेव्हा माझ्या पक्षाचे दोन आमदार होते. उलट तेव्हा शिवसेना (ठाकरे) माझ्या विरोधात लढली होती, एवढंच नाही तर माझ्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सभा देखील घेतली होती”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“उद्धव ठाकरे यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की आपलं म्हणजे शिवसेनेचं संख्याबळ अधिक दिसलं पाहिजे. त्यामुळे आम्हाला मुख्यमंत्री पदावर दावा करता येईल. मात्र, आता त्यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केलं, त्यावर त्यांना असं म्हणायचं आहे का? की आमची मदत त्यांना झाली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला हे ते विसरत आहेत”, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
माझ्याऐवजी शंकरराव गडाख यांना कॅबिनेट मंत्रीपद
“उद्धव ठाकरे यांनी तेव्हा मला एकट्या अपक्षाला मंत्री केलं नव्हतं. तेव्हा मला तर ते कॅबिनेट मंत्रिपद देणार होते, पण देताना राज्यमंत्री पद दिलं. शंकरराव गडाख यांना माझ्याऐवजी कॅबिनेट मंत्री केलं. पण उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मंत्री का केलं? याचं कारणही त्यांना विचारलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मला कॅबिनेट मंत्री पदाचा शब्द दिला होता. पण नंतर सांगितलं की कॅबिनेट मंत्री पद शक्य होणार नाही. मात्र, या कॅबिनेट मंत्रिपदाच्या अटीवरच त्यांना पाठिंबा दिला होता”, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला.

COMMENTS