बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननावर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारात गो

बीड : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननावर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, गेवराई तालुक्यातील सुरळेगाव शिवारात गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर चकलांबा पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 15 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दि. 04 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास सुरळेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी दोन ट्रॅक्टर व लोखंडी ट्रॉलींच्या साहाय्याने वाळू वाहतूक केली जात होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एक लाल रंगाचा ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) एक निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर (ट्रॉलीसह) असा एकूण 15,03,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आशोक बृहती आरबड, गोपाल दिनकर आरबड, वनराज राधाकिसन शिरसट (रा. सुरळेगाव, ता. गेवराई), दगडू उर्फ शाम जिजा राऊत (रा. उमापूर), विशाल शिवाजी चव्हाण (रा. गुळज, ता. गेवराई), यांच्याविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 136/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5), 132 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात आरोपींनी कोणताही शासकीय परवाना न घेता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गोदावरी नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा र्हास होण्यासोबतच नदीच्या प्रवाहावर व परिसरातील शेतीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात पोलीस हवालदार बांगर, पोलीस शिपाई रवी ठोकळ, संदीप गायकवाड, रमेश बारगजे तसेच सरकारी वाहन चालक मुकेश बनसोडे यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चांदमारे हे करीत असून, अवैध वाळू उत्खननाशी संबंधित आणखी काही आरोपी व वाहनांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननाविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS