मुंबई : राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने

मुंबई : राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने अखेर मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा तयार करण्यात आला असून त्यास समितीची अंतिम मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे पंढरपूर शहरातील विकासकामांना गती मिळणार असून प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाला भूसंपादनाची प्रक्रिया 1 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित कामे हाती घेतली जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसर आणि शहराचा एकात्मिक विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये मंदिराभोवती विस्तृत आणि सुसज्ज मार्गांची उभारणी, भाविकांसाठी प्रतीक्षा व्यवस्था, विश्रांती सुविधा आणि स्वच्छता व्यवस्था, गर्दी नियंत्रणासाठी आधुनिक नियोजन आणि मार्गदर्शन व्यवस्था, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा आणि पर्यायी मार्गांची निर्मिती, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध दर्शनाचा अनुभव मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी मानला जात असून पंढरपूरच्या भविष्यातील विकासाचा पाया म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. शहराचा धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी हा उपक्रम निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. कॉरिडॉरमुळे काही व्यापार्यांना स्थलांतर करावे लागण्याची शक्यता असल्याने सुरुवातीला स्थानिक व्यापार्यांनी चिंता व्यक्त करत विरोध दर्शवला होता. मात्र, शासनाकडून व्यापार्यांशी सातत्याने संवाद साधण्यात आला. प्रकल्पामुळे भविष्यात भाविकांची संख्या वाढून व्यापारालाही चालना मिळेल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर वातावरण काहीसे निवळले असल्याचे सांगितले जाते. मंजुरीनंतर आता भूसंपादन, आराखड्याची अंमलबजावणी आणि विविध प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. नियोजित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. एकूणच, पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा व्यक्त होत असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंढरपूरच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
भाविकांच्या सुविधांना प्राधान्य
पंढरपूर हे विठ्ठल-रुख्मिणी मंदिर यामुळे देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीसह विविध उत्सवांच्या काळात येथे प्रचंड गर्दी होते. मागील आषाढी एकादशीच्या वेळी सुमारे अठ्ठावीस लाख भाविकांनी पंढरपूरात हजेरी लावल्याची नोंद झाली होती. वाढती गर्दी लक्षात घेऊन सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध दर्शनव्यवस्था उभारण्याची गरज अधोरेखित झाली होती. या पार्श्वभूमीवर कॉरिडॉर प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS