कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यातील अनेक भागांत तणावपूर्ण आणि काही ठिकाणी हिंसक परिस्थिती निर्माण झाल्याच

कोलकाता : विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यातील अनेक भागांत तणावपूर्ण आणि काही ठिकाणी हिंसक परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नादिया, हावडा, हुगळी आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यांत विखुरलेल्या स्वरूपात झटापटी, तोडफोड, तसेच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्षाच्या घटना घडल्या. या घटनांमुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बसंती भागात एका प्रमुख पक्षाच्या उमेदवारावर हल्ला झाल्याचा आरोप समोर आला. संबंधित उमेदवार मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी बूथ क्रमांक 76 येथे गेले असताना काही जणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचे सांगितले जाते. या वेळी त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. सुरक्षारक्षकांकडील शस्त्रे हिसकावण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून मतदारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. पानिहाटी विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 145 येथे दोन प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमकीने सुरुवात झालेली ही घटना काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचली. मतदान सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. नंतर केंद्रीय सुरक्षा दलांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. हुगळी जिल्ह्यातील रामचंद्रपूर (बूथ क्रमांक 147) येथे मतदान प्रतिनिधींच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला. एका गटाने बनावट प्रतिनिधी नियुक्त केल्याचा आरोप केल्यानंतर दुसर्या गटाने त्याला तीव्र विरोध केला. या वादाचे रूपांतर लवकरच झटापटीत झाले. काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. हुगळी-चुचुडा भागात रस्त्याच्या कडेला लावलेले निवडणूक बॅनर काढून टाकल्याने नवीन वाद निर्माण झाला. तसेच काही बूथवर (27, 28 आणि 29) मतदार याद्या फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या सर्व घटनांनंतर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना केल्या जातील, असे अधिकार्यांनी स्पष्ट केले. एकूणच, दुसर्या टप्प्यातील मतदानात काही ठिकाणी तणाव आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या असल्या, तरी बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह
काही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दल उपस्थित असूनही त्यांनी त्वरित हस्तक्षेप केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. काही घटनांमध्ये कार्यकर्त्यांनी सुरक्षा दलांना घटनास्थळावरून हटवण्याचा प्रयत्न केल्याचाही दावा समोर आला आहे. त्यामुळे निवडणूक काळातील सुरक्षा व्यवस्थेवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

COMMENTS