मुंबई : राज्यभर सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभाग विशेषतः उकाड्यान

मुंबई : राज्यभर सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अनेक शहरांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विदर्भ आणि मराठवाडा विभाग विशेषतः उकाड्याने होरपळून निघत असून दुपारच्या सुमारास शहरांतील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत असून काही ठिकाणी शाळांच्या वेळांत बदल करण्यात आला आहे, तर अनेक ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विदर्भातील शहरांमध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. अकोला शहरात मागील काही दिवसांत तापमान झपाट्याने वाढले असून ते 46 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. एप्रिलच्या तिसर्या आठवड्यापासूनच येथे तापमान 43 ते 45 अंशांच्या दरम्यान राहिले आहे. दिवसेंदिवस वाढणार्या या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळले जात आहे. अमरावती येथेही यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. येथे कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील परभणी येथे उष्माघातामुळे एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर अचानक प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातही उष्माघाताचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. गोंद्री येथे एका नऊ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, तर यापूर्वी औराद शहाजनी येथे एका वृद्ध शेतकर्याचाही उष्माघाताने बळी गेला होता. या घटनांमुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जळगाव शहरात तापमान 43 अंशांच्या पुढे गेले असून यंदाच्या उन्हाळ्यातील हा उच्चांक ठरला आहे. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेकडून प्रमुख चौकांमध्ये पाणी शिंपडण्याची मोहीम राबवली जात आहे. नंदूरबार जिल्ह्यातही तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे. कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. मुंबईतही तापमानात वाढ होत असून पारा 39 अंशांवर पोहोचला आहे. हवामान विभागाने शहर व उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर कमी प्रमाणात पडण्यास प्राधान्य दिले आहे. थंड हवामानासाठी ओळखल्या जाणार्या नाशिक जिल्ह्यातही यंदा उष्णतेचा जोर वाढला आहे.
प्रशासनाकडून दक्षता घेण्याचे आवाहन
राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोके झाकून बाहेर पडणे आणि आवश्यक ती खबरदारी घेणे, असे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS