महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीबा जोतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. छत्रपती शिव

महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीबा जोतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण रयतेचे राजे असा क्रांतीबा जोतीबा फुले यांनी केला आहे. फुले-शाहू-आंबेडकर हे सामाजिक, वैचारिक आणि वैधानिक अधिकार देणारे आहेत; तर, छत्रपती शिवाजी महाराज हे सत्तेचे अधिष्ठान बहुजनांसाठी राबविणारे इतिहासातील युगपुरुष. प्रभू, सध्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिक विषमतेच्या छावणीकडे असल्याने त्यांना सत्तेचा माज चढला आहे. अशा भंपक माजोऱ्या व्यक्तीमत्वांपैकी एक मस्तवाल मंत्री म्हणजे संजय गायकवाड.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परंपरेला हादरा देणारी ही घटना केवळ एका आमदाराच्या संतापाची नाही, तर लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर झालेला उघड आघात आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दाखवलेली ही आक्रमकता आणि असहिष्णुता पाहता, प्रश्न पडतो, आपण खरंच २१व्या शतकात जगतोय की अजूनही दडपशाहीच्या युगात अडकून पडलो आहोत? तब्बल ३७ वर्षांपूर्वी गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून अचानक पेटून उठणे, आणि त्यासाठी थेट प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधीस साजेसे नाही, तर ते सत्तेच्या मदाने बेभान झालेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक कणाकणात आदराने उच्चारले जाते. पण त्यांच्या नावाचा आधार घेऊन भीती निर्माण करणे, दडपशाही करणे, आणि मतभिन्नतेला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणे, ही त्यांच्या वारशाची सर्वात मोठी विटंबना आहे. शिवाजी महाराजांनी शौर्याबरोबरच विवेक, न्याय आणि सहिष्णुता यांचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. त्यांनी कधीही विचारांच्या विरोधाला हिंसक प्रतिसाद दिला नाही. मग आज त्यांच्या नावाने अशा कृती करणाऱ्यांना आपण कसे समर्थन देऊ शकतो?
लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसते; ती विचारस्वातंत्र्य, संवाद आणि असहमतीच्या अधिकारावर उभी असते. एखाद्या पुस्तकाशी मतभेद असतील, तर त्याला उत्तर म्हणून लेख लिहा, चर्चा करा, वादविवाद घडवून आणा, पण धमक्या देणे हा मार्ग कधीच लोकशाहीचा नसतो. गायकवाड यांचे वर्तन हे केवळ असहिष्णुतेचे नव्हे, तर बौद्धिक दिवाळखोरीचे प्रतीक आहे.
याहूनही अधिक धक्कादायक म्हणजे, अशा प्रकारच्या घटनांनंतरही राजकीय व्यवस्थेतून ठोस आणि कठोर प्रतिक्रिया क्वचितच दिसते. ही मौनसंमतीच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालते. जेव्हा सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःच कायद्याची पायमल्ली करतात, तेव्हा सामान्य नागरिकांमध्ये काय संदेश जातो? की ताकद असेल, तर तुम्ही काहीही करू शकता? अशा प्रवृत्तींना ठामपणे विरोध करण्याची गरज आहे. कारण ही केवळ एका पुस्तकाची किंवा एका व्यक्तीची बाब नाही. हा प्रश्न आहे आपल्या समाजाच्या बौद्धिक स्वातंत्र्याचा, अभिव्यक्तीच्या अधिकाराचा आणि लोकशाहीच्या भवितव्याचा. आपण स्वतःलाच विचारायला हवे की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा केवळ राजकीय वापर करतो आहोत का, की त्यांच्या मूल्यांना खरोखर आत्मसात करतो आहोत? जर खऱ्या अर्थाने त्यांचा आदर करायचा असेल, तर त्यांच्या विचारांचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. त्या विचारांमध्ये धमक्या, द्वेष आणि हिंसेला कोणतीही जागा नाही.
महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख ही विचारांची परंपरा, संतांची शिकवण आणि प्रगत मूल्ये यांवर आधारित आहे. या परंपरेला जर आपण खरोखर जपायचे असेल, तर अशा असहिष्णु आणि धोकादायक प्रवृत्तींना स्पष्ट शब्दांत नाकारले पाहिजे. अन्यथा, उद्या प्रत्येक मतभिन्न आवाज गप्प केला जाईल आणि तेव्हा लोकशाही फक्त नावापुरती उरेल.


COMMENTS