पुणे : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, स्मार्ट शेती प्रकल्पासाठी 90 कोटी र

पुणे : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, स्मार्ट शेती प्रकल्पासाठी 90 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्राप्त झाली आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने ही रक्कम उपलब्ध झाली आहे. या निधीमुळे राज्यातील तंत्रज्ञानाधारित शेतीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही गुंतवणूक अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विकास वित्त संस्था मार्फत न्यूट्रीफ्रेश फार्म्स या कंपनीला मिळाली आहे. याआधी राज्य शासन, रूरल एन्हान्सर्स आणि संबंधित कंपनी यांच्यात नियंत्रित वातावरणातील शेतीसाठी सुमारे 2500 कोटी रुपयांचा करार झाला होता. त्यातील परकीय गुंतवणुकीचा हा पहिला टप्पा मानला जात आहे. या निधीचा उपयोग पुणे जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर तसेच नागपूर परिसरात प्रकल्प उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत नियंत्रित वातावरणातील शेती तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि दर्जेदार कृषी उत्पादन निर्माण करणे यावर भर दिला जाणार आहे.
रूरल एन्हान्सर्सचे संस्थापक अंबर आयदे यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रावर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा आहे. या गुंतवणुकीमुळे अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील आणि निर्यातक्षम कृषी पुरवठा साखळी अधिक सक्षम होईल. न्यूट्रीफ्रेश फार्म्सचे सहसंस्थापक गणेश निकम यांनीही या उपक्रमामुळे नियंत्रित वातावरणीय शेतीला मोठी चालना मिळेल, असे स्पष्ट केले. अचूक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्यांचे उत्पन्न वाढविणे आणि शेती अधिक टिकाऊ बनविणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुंतवणुकीचे स्वागत करताना सांगितले की, दावोस परिषदेत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता प्रत्यक्षात होत असल्याचे हे द्योतक आहे. अशा भागीदारीमुळे राज्यात अचूक शेतीचा प्रसार होईल, शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल आणि जागतिक अन्न व्यवस्थेत महाराष्ट्राची भूमिका अधिक बळकट होईल.

COMMENTS